शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ नगरपरिषदेतील विविध विषय समित्यांच्या निवडीकडे सध्या शिरोळ शहरातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.नगरपरिषदेच्या कामकाजात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या स्वच्छता,वैद्यक व सार्वजनिक आरोग्य तसेच सार्वजनिक बांधकाम या विषय समित्यांच्या सभापतीपदासाठी कोणाची वर्णी लागणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.या समित्यांच्या माध्यमातून शहरातील विकासकामांचा वेग,गुणवत्ता आणि नियोजन ठरते. त्यामुळे अनुभवी,अभ्यासू आणि कार्यक्षम नगरसेवकांचीच निवड व्हावी अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांतून व्यक्त होत आहे.वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभापतीपदासाठी सौ.विदुला यादव व सौ.अनिता गजानन संकपाळ यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.शहरातील आरोग्य सुविधा,स्वच्छता व्यवस्था,रोग प्रतिबंधक उपाययोजना आदी बाबींमध्ये ही समिती महत्त्वाची असल्याने या पदावर जबाबदार आणि सक्षम नेतृत्व मिळावे,अशी भावना नागरिकांमध्ये आहे.तर सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदासाठी अनुराधा गुरव आणि दिपाली फल्ले यांच्या नावांची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.बांधकाम परवाने,रस्ते,गटारी, इमारती,नागरी सुविधा आदी विकासकामांवर या समितीचा थेट प्रभाव असल्याने या पदालाही विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.शिरोळ नगरपरिषदेमध्ये शिव शाहू प्रणित यादव पॅनेलची एक हाती सत्ता असून पॅनेलचे प्रमुख पृथ्वीराजसिंह यादव यांच्याकडे विषय समित्यांच्या सभापती निवडीचे सर्वस्वी अधिकार आहेत.त्यामुळे अंतिम निर्णय कोणाच्या बाजूने जाणार,याबाबत सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे लागले आहे.यादव हे सर्व नगरसेवकांशी सकारात्मक चर्चा करून,अनुभव,कार्यक्षमता आणि पक्षातील समतोल साधत योग्य निर्णय घेतील,असा विश्वास व्यक्त केला जात आहे.यादव पॅनेलमधील अनेक नगरसेवक सभापतीपदासाठी इच्छुक असून, अंतर्गत राजकीय हालचालींना सध्या वेग आला आहे.येत्या काही दिवसांत विषय समित्यांची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता असून, त्यानंतर शिरोळ नगरपरिषदेच्या विकासकामांना अधिक गती मिळेल,अशी आशा शिरोळवासीयांकडून व्यक्त होत आहे.