जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी शिरोळ तालुक्यात १०१ उमेदवारी अर्जाची विक्री

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

शिरोळ तालुक्यातील ७ जिल्हा परिषद व १४ पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी राजकीय हालचाली जोर धरत आहेत. निवडणूक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार,शुक्रवारी निवडणूक प्रक्रियेसाठी एकूण १०१ उमेदवारी अर्जाची विक्री झाली आहे.मात्र, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी अजून पर्यंत एकही अर्ज दाखल झालेला नाही.उमेदवारी अर्ज ऑफलाइन पद्धतीने दाखल केले जाणार असून,अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत २१ जानेवारी ठरवण्यात आली आहे.शिरोळ तालुक्यातील उदगाव, आलास, दत्तवाड,अब्दुललाट, यड्राव, नांदणी आणि दानोळी हे सात जिल्हा परिषद गट तसेच तालुका पंचायत समितीच्या १४ गटांसाठी मतदान होणार आहे.तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ७ गटात सुमारे २ लाख ४० हजार मतदार नोंदणीकृत आहेत. निवडणुकीसाठी २३२ मतदान केंद्रे कार्यरत करण्यात आली आहेत, तर निवडणूक संचालनासाठी १,१६० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.उपजिल्हाधिकारी अर्चना नष्टे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहण्यास सुरुवात केली आहे. तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तसेच तहसीलदार अनिलकुमार हेळकर हे देखरेख करीत आहेत. सोमवारपासून उमेदवारांची झुंबड उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येण्याची शक्यता आहे.त्यामुळे तालुक्यातील राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी तयारीला गती दिली आहे.शिवाय, पहिल्या दिवशीच १०१ उमेदवारी अर्जांची विक्री झाल्याने उमेदवारांमध्ये उत्सुकता वाढल्याचे दिसून येत आहे.स्थानिक राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे की,अर्ज विक्रीच्या या आकड्यामुळे आगामी निवडणुकीत प्रतिस्पर्धा तीव्र होईल. निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेसाठी आणि मतदारांपर्यंत सर्व माहिती वेळेत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे.उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह वेळेत अर्ज दाखल करणे गरजेचे असल्याचे देखील निवडणूक विभागाने सांगितले आहे.शिरोळ तालुका निवडणूक वातावरण सध्या उत्सुकतेने भरलेले असून,येत्या काही दिवसांत उमेदवारांची संख्या लक्षणीय वाढेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!