आदर्श आचारसंहितेचा भंग केल्यास कडक कारवाई – निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना नष्टे

Spread the love
शिरोळ / प्रतिनिधी 
शिरोळ तालुक्यात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल,असा इशारा निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अर्चना नष्टे यांनी दिला. शिरोळ येथील पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.शिरोळ तालुक्यातील उदगाव,आलास,दत्तवाड,अब्दुललाट,यड्राव,नांदणी व दानोळी या ७ जिल्हा परिषद गटांसह १४ पंचायत समिती गणांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.शुक्रवारपासून नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार असून,त्यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे,अशी माहिती त्यांनी दिली.निवडणूक अधिकारी नष्टे म्हणाल्या की,शिरोळ तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ७ गटांमध्ये सुमारे २ लाख ४० हजार १०२ मतदार असून, त्यांच्यासाठी २३२ मतदान केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पडावी यासाठी २७ क्षेत्रीय अधिकारी व ११६० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.निवडणूक खर्चाबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की,जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांना ७ लाख ५० हजार रुपये,तर पंचायत समिती निवडणुकीसाठी ५ लाख २५ हजार रुपयांची खर्च मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.नामनिर्देशन अर्ज ऑफलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत.दुबार मतदार असलेल्या व्यक्तींनी ज्या ठिकाणी मतदान करणार आहेत,त्या ठिकाणीच मतदान करण्यासाठी संबंधित विभागाकडून लेखी परवानगी घेणे बंधनकारक आहे. निवडणूक काळात व्यक्तिगत टीकाटिप्पणी, जातीय तेढ निर्माण करणारी वक्तव्ये किंवा आचारसंहितेचे उल्लंघन करणारे कोणतेही कृत्य खपवून घेतले जाणार नाही,असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला. तसेच गरजेपेक्षा जास्त प्रचार सभांसाठी जागा आरक्षित केली जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.या पत्रकार परिषदेस सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अनिलकुमार हेळकर,गट विकास अधिकारी विजय परीट, कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते.

Leave a Comment

error: Content is protected !!