अचानक आग लागून इलेक्ट्रिक दुचाकी जळून खाक, पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा दाखल

Spread the love

कोल्हापूर / प्रतिनिधी 

पुणे–बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील उचगांव परिसरात काल एका इलेक्ट्रिक दुचाकीला अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. TVS कंपनीची आयक्युब इलेक्ट्रिक दुचाकी महामार्गावरून उचगांवकडे जात असताना चालकाला दुचाकीतून धूर येत असल्याचे लक्षात आले.प्रसंगावधान राखत चालकाने दुचाकी तात्काळ रस्त्याच्या कडेला थांबवली. काही क्षणातच दुचाकीने पेट घेतला आणि आगीमुळे ती पूर्णपणे जळून खाक झाली.सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्राथमिक माहिती नुसार ही इलेक्ट्रिक दुचाकी स्थानिक रहिवासी यमगर यांच्या मालकीची होती.दुचाकीचे अचानक जळणे पाहून परिसरातील नागरिकांनीही धूर पाहून मदतीसाठी धाव घेतली, पण आग इतकी झपाट्याने पसरली होती की काही मिनिटांत दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली.घटनेनंतर महामार्गावर बघ्यांची मोठी गर्दी जमली, ज्यामुळे काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. मात्र पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनी वेळेत घटनास्थळी पोहोचून वाहतुकीचे नियोजन केले. दरम्यान दुचाकीच्या अचानक आग लागण्यामागे कोणता तांत्रिक दोष होता, हे तपासणी करून TVS कंपनीने या घटनेवर तातडीने लक्ष देण्याची व ग्राहकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती कारवाही करण्यााची मागणी केली जात आहे.स्थानिक रहिवासी आणि प्रवाशांसाठी ही घटना सावधगिरीचे उदाहरण ठरली आहे. तंत्रज्ञानातील त्रुटी किंवा बॅटरीशी संबंधित संभाव्य कारणांवर अधिकाऱ्यांचे लक्ष केंद्रीत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!