डॉ.सुरज बुरसे यांना ‘डॉक्टर सॅम्युएल हॅनिमन जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान

Spread the love

जयसिंगपूर / प्रतिनिधी 

जयसिंगपूर येथील प्रथितयश होमिओपॅथिक डॉक्टर, क्रिकेट क्लब जयसिंगपूरचे संस्थापक सदस्य तसेच सामाजिक कार्यकर्ते डॉ.सुरज बुरसे यांना महाराष्ट्र राज्य होमिओपॅथिक डॉक्टर असोसिएशनच्या वतीने संस्थेच्या प्रतिष्ठेच्या ‘डॉक्टर सॅम्युएल हॅनिमन जीवनगौरव पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले. सामाजिक कार्य, संघटनात्मक व व्यवस्थापन कौशल्य, तसेच क्रीडा व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल हा सन्मान प्रदान करण्यात आला.२०२६ चे नॅशनल होमिओपॅथी सेमिनार नुकतेच कोल्हापूर येथील हॉटेल पॅव्हिलियन येथे मोठ्या उत्साहात पार पडले. या सेमिनारदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या भव्य पुरस्कार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते आणि असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्या व सभासदांच्या उपस्थितीत डॉ.सुरज बुरसे यांना हा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.या सोहळ्याला राज्यभरातून आलेले अनेक नामवंत होमिओपॅथी तज्ज्ञ, डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.महाराष्ट्र राज्यातील शंभर नामांकित होमिओपॅथी डॉक्टरांमधून केवळ दहा डॉक्टरांची या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. त्यामध्ये डॉ.सुरज बुरसे यांची निवड होणे ही जयसिंगपूर व परिसरासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे. त्यांच्या वैद्यकीय सेवेसोबतच सामाजिक बांधिलकी, रुग्णसेवा, आरोग्य जनजागृती उपक्रम, तसेच क्रीडा क्षेत्रात केलेले योगदान विशेष उल्लेखनीय ठरले आहे.डॉ.सुरज बुरसे हे गेल्या अनेक वर्षांपासून होमिओपॅथीच्या माध्यमातून रुग्णसेवा करत असून त्यांनी समाजातील दुर्बल घटकांसाठी विविध आरोग्य शिबिरे, मोफत तपासण्या व मार्गदर्शन उपक्रम राबवले आहेत. तसेच क्रिकेट क्लब जयसिंगपूरच्या माध्यमातून युवकांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले आहे.या पुरस्काराने सन्मानित झाल्यानंतर सर्व स्तरातून डॉ. सुरज बुरसे यांचे अभिनंदन व कौतुक होत असून त्यांच्या कार्याला यामुळे नवी प्रेरणा मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!