माणगाव / प्रतिनिधी
माणगाव पंचायत समिती गणातील माणगाव,माणगाववाडी, अतिग्रे,साजणी व मुडशिंगी या गावांतील महिलांसाठी वैष्णवी चॅरिटेबल ट्रस्ट व राजू मगदूम युवाशक्ती माणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत गणपतीपुळे, मारलेश्वर व नाणीज देवदर्शन सहल आयोजित करण्यात आली होती.या सहलीचा उद्घाटन शुभारंभ हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार दलितमित्र डॉ.अशोकराव माने (बापू) यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला.यावेळी माणगावचे लोकनियुक्त सरपंच राजू मगदूम व सौ.मिनल राजू मगदूम यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.महिलांच्या धार्मिक, सामाजिक आणि मानसिक आरोग्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार डॉ.माने यांनी आपल्या भाषणात केले.महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा,असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.या शुभारंभ प्रसंगी साजणीचे सरपंच शिवाजी पाटील,स्वामी समर्थ सूतगिरणीचे कार्यकारी संचालक व रुई जि.प.इच्छुक उमेदवार सुहास राजमाने, तिळवणीचे सरपंच राजेश पाटील,अनिल पाटील,अतिग्रेचे धुळोबा पाटील,माणगावचे उपसरपंच अक्त्खर हुसेन भालदार, प्रमोद कदम,सयाजी पाटील,पंड्या शेठजी,सागर खोत यांच्यासह महिला भगिनी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.राजू मगदूम युवाशक्ती व वैष्णवी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून यापूर्वीही अनेक सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक उपक्रम राबविण्यात आले असून महिलांसाठी मोफत देवदर्शन सहल हा उपक्रम विशेष कौतुकास्पद असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.सहलीसाठी आवश्यक असलेली वाहतूक,भोजन व इतर सोयी मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.या सहलीमुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून आयोजकांचे महिलांनी मनापासून आभार मानले.अशा उपक्रमांमुळे सामाजिक सलोखा व एकोप्याची भावना अधिक बळकट होत असल्याचे चित्र माणगाव परिसरात पाहायला मिळाले.