गोकुळ दूध संघाची विश्वासार्हता दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अवलंबून – नावेद मुश्रीफ

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

मुंबई,पुण्यासह राज्यातील विविध शहरांमध्ये गोकुळ दूध संघाच्या म्हैशीच्या दुधाला दिवसेंदिवस मोठी मागणी वाढत आहे.शहरी भागातील पैसा ग्रामीण भागात आणण्यासाठी शेतकऱ्यांनी म्हैशीच्या दुधाचे उत्पादन वाढवावे, असे आवाहन गोकुळ दूध संघाचे चेअरमन नावेद हसन मुश्रीफ यांनी केले.गोकुळ दूध संघामार्फत दूध उत्पादकांसाठी तब्बल ३२ योजना राबविण्यात येत असून त्याचा लाभ जास्तीत जास्त उत्पादकांनी घ्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.येथील गणेश सहकारी दूध उत्पादक संस्थेच्या नूतन इमारतीच्या प्रवेश शुभारंभप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर होते.नावेद मुश्रीफ पुढे म्हणाले की,आगामी आठ दिवसांत गोकुळ दूध संघ २० लाख लिटर प्रतिदिन दूध संकलनाचा महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण करणार आहे.या यशामध्ये दूध उत्पादकांची भूमिका महत्त्वाची असून सर्वांनी संघाला साथ द्यावी,असे आवाहन त्यांनी केले.यावेळी गोकुळचे माजी चेअरमन अरुण डोंगरे यांनी सांगितले की,दूध उत्पादक शेतकऱ्यांना एक-दोन म्हैशी खरेदी करण्यासाठी गोकुळ दूध संघामार्फत विनातारण कर्जपुरवठा केला जात आहे.तसेच मुरा जातीच्या म्हैशी खरेदीसाठी अनुदान देण्यात येत असून शिरोळ तालुक्यातून म्हैशीच्या दुधाचा पुरवठा वाढवण्यासाठी उत्पादकांनी विशेष प्रयत्न करावेत, असे त्यांनी नमूद केले.माजी चेअरमन विश्वास नारायण पाटील म्हणाले की,शिरोळ तालुक्यातील उदगाव येथील दूध संकलन केंद्रावर दूध संकलन सुरू झाल्यामुळे येथील दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे.गोकुळ दूध संघाची विश्वासार्हता ही दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अवलंबून असून भविष्यात तालुक्यातील संस्था प्रतिनिधींना न्याय देण्यासाठी नेतेमंडळी निश्चितच प्रयत्न करतील अशी ग्वाही त्यांनी दिली.आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिरोळ तालुक्यातील गोकुळशी संलग्न असणाऱ्या दूध संस्थांच्या कामकाजाची माहिती दिली.तसेच यावर्षी होणाऱ्या संघाच्या निवडणुकीत शिरोळ तालुक्याला प्रतिनिधित्व मिळावे,अशी मागणी त्यांनी यावेळी केली.संस्थेचे चेअरमन नारायण महात्मे यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेताना सांगितले की,सध्या संस्थेमार्फत प्रतिदिन १,६०० लिटर दूध संकलन केले जात आहे.काटकसरीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने संस्था चालविल्यामुळे तब्बल ३१ लाख रुपयांची नूतन इमारत उभारण्यात यश आले असल्याचे त्यांनी नमूद केले.या समारंभास गोकुळ दूध संघाचे संचालक शशिकांत पाटील चुयेकर, युवराज पाटील, माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, रणजीत पाटील,रामदास गावडे यांच्यासह मोठ्या संख्येने दूध उत्पादक व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Comment

error: Content is protected !!