शिरोळ नगरपरिषदेच्या विषय समिती सभापती निवडीकडे नगरसेवकांसह नागरिकांचे लक्ष 

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

शिरोळ नगर परिषदेमध्ये उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक निवडी नुकत्याच पार पडल्या असून, त्यानंतर आता नगर परिषदेच्या विषय समित्यांच्या रचनेकडे सर्व नगरसेवकांसह नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.नगर परिषदेमध्ये सार्वजनिक बांधकाम समिती,आरोग्य, स्वच्छता व वैद्यक समिती,पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती,महिला व बाल कल्याण समिती,शालेय शिक्षण व क्रीडा समिती या महत्त्वाच्या विषय समित्या असून,या समित्यांच्या सभापतीपदासाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिरोळ नगर परिषदेमध्ये शिव शाहू प्रणित यादव पॅनेलची स्पष्ट सत्ता असून, नगर परिषदेतील सर्व निर्णयांमध्ये या पॅनेलची भूमिका निर्णायक ठरणार आहे.पॅनेलचे प्रमुख पृथ्वीराज सिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली कोणत्या नगरसेवकाला कोणत्या समितीचे सभापतीपद दिले जाणार,याबाबत सध्या मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. प्रत्येक समितीचे महत्त्व लक्षात घेता, अनुभवी व सक्षम नगरसेवकांनाच संधी दिली जावी,अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.सार्वजनिक बांधकाम समिती ही शहरातील रस्ते,गटारी, इमारती तसेच विकासकामांशी थेट संबंधित असल्याने या समितीच्या सभापतीपदाला विशेष महत्त्व आहे. शिक्षण समितीमुळे शहरातील शाळा, विद्यार्थ्यांचे प्रश्न व शैक्षणिक सुविधांचा विकास होणार असल्याने या समितीकडेही सर्वांचे लक्ष आहे.वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समितीमार्फत आरोग्य सेवा,स्वच्छता व साथीचे आजार याबाबत महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत.पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती ही नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असून,पाणीटंचाई, निचरा व्यवस्था व स्वच्छ पाणीपुरवठा याबाबत प्रभावी कामकाज अपेक्षित आहे.यादव पॅनेलमध्ये अनेक इच्छुक नगरसेवक सभापतीपदासाठी प्रयत्नशील असून,पॅनेल प्रमुख पृथ्वीराजसिंह यादव हे सर्वांशी चर्चा करून योग्य तो तोल साधत निर्णय घेणार असल्याचे सांगितले जात आहे. येत्या काही दिवसांत विषय समित्यांची घोषणा होण्याची शक्यता असून,त्यानंतर शिरोळ नगर परिषदेच्या विकासकामांना अधिक गती मिळेल,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!