शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ नगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत शिव – शाहू आघाडी प्रणित यादव पॅनेलने एकहाती सत्ता मिळवत शहराच्या राजकारणात नवे पर्व सुरू झाले आहे.या विजयानंतर यादव पॅनेलचे प्रमुख व नगरसेवक पृथ्वीराजसिंह यादव यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली असून शहराच्या विकासाला गती देण्यासाठी ठोस पावले उचलली जात असल्याचे चित्र दिसत आहे.निवडणूक काळात आघाडीच्या नेत्यांनी आणि यादव पॅनेलने शहरातील नागरिकांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी नगरपालिका प्रशासनानेही तत्पर असणे गरजेचे आहे.हाच दृष्टिकोन ठेवून उपनगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारताच पृथ्वीराजसिंह यादव यांनी दमदार कामकाजाला सुरुवात केली आहे.पदभार स्वीकारल्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून ते दररोज सकाळी नऊ वाजता नगरपालिका सभागृहात उपस्थित राहून विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेत आहेत.नगरपालिकेतील विकासकामे,नागरी सुविधा,पाणीपुरवठा,स्वच्छता,रस्ते,आरोग्य व प्रशासकीय कामकाज यावर विशेष लक्ष देत संबंधित अधिकाऱ्यांना वेळेत कामे पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या जात आहेत. त्यामुळे यापूर्वी बेशिस्त असलेल्या कामकाजावर वचक बसणार असून,नागरिकांची प्रलंबित कामे वेळेत मार्गी लागतील,अशी अपेक्षा शहरवासीयांकडून व्यक्त केली जात आहे. उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव यांच्या निःपक्ष आणि निस्वार्थी कार्यपद्धतीची सध्या शहरात जोरदार चर्चा सुरू आहे.कोणताही राजकीय दबाव न ठेवता सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याची त्यांची भूमिका नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करणारी ठरत आहे.नगरपालिका म्हणजे केवळ कार्यालय नसून ती नागरिकांची सेवा करणारी संस्था आहे,या भावनेतून ते काम करत असल्याचे त्यांच्या दैनंदिन उपस्थितीतून स्पष्ट होते.यादव पॅनेलला मिळालेल्या भरघोस जनादेशाचे सोने करण्यासाठी नगराध्यक्ष,उपनगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक एकत्रितपणे काम करतील,असा विश्वास व्यक्त केला जात आहे.येणाऱ्या काळात शिरोळ शहराचा सर्वांगीण विकास साधत नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण होतील, अशी आशा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.