शिरोळ नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी पृथ्वीराजसिंह यादव यांची बिनविरोध निवड

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

शिरोळ नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष तसेच स्वीकृत नगरसेवक पदासाठी गुरुवारी निवड प्रक्रिया पार पडली.या प्रक्रियेत यादव पॅनेलचे प्रमुख नगरसेवक पृथ्वीराजसिंह यादव यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.तसेच स्वीकृत नगरसेवक पदासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे व युवा सामाजिक कार्यकर्ते निलेश गावडे यांची निवड जाहीर करण्यात आली.या निवडीनंतर शिव – शाहू आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत फटाक्याची आतिषबाजी व गुलालाची उधळण करून आनंद व्यक्त केला.शिरोळ नगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सत्तांतर होऊन शिव–शाहू आघाडी प्रणित यादव पॅनेलची एकतर्फी सत्ता स्थापन झाली आहे.या पार्श्वभूमीवर गुरुवारी दुपारी १२ वाजता उपनगराध्यक्ष निवडीसाठी नगरपालिकेत पहिली विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त नगराध्यक्षा योगिता सतीश कांबळे उपस्थित होत्या. उपनगराध्यक्ष पदासाठी नामनिर्देशन दाखल करण्याच्या मुदतीत पृथ्वीराजसिंह यादव यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने सभेच्या अध्यक्ष नगराध्यक्षा योगिता कांबळे यांनी उपनगराध्यक्षपदी पृथ्वीराजसिंह यादव यांची बिनविरोध निवड झाल्याचे अधिकृतरीत्या जाहीर केले.याच सभेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे आणि निलेश गावडे यांच्या नावांना मान्यता देण्यात आली.निवड जाहीर होताच शिव – शाहू आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत फटाक्याची आतिषबाजी व गुलालाची उधळण केली. यावेळी नूतन उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव,स्वीकृत नगरसेवक सचिन शिंदे, निलेश गावडे, गजानन संकपाळ, पंडित काळे, डॉ. दगडू माने, मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांच्यासह अनेक मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली.याप्रसंगी शिव – शाहू आघाडीचे नवनिर्वाचित नगरसेवक अनिता संकपाळ, सविता पुजारी, रेखा कोरे, दिपाली फल्ले, कल्पना काळे, अनुराधा गुरव, सुवर्णा कांबळे, उल्हास आवळे, राहुल कोळी, विजय आरगे, शरद मोरे, दीपक भाट, ओंकार माने–गावडे यांच्यासह प्रकाश गावडे, बाबा पाटील, दरगु गावडे, आनंद देशमुख, रावसाहेब माने, मानसिंग पाटील, बी.जी.माने, करण जगदाळे, शक्तिजीत गुरव, अक्षय गवळी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.निवडीनंतर बोलताना नूतन उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव म्हणाले की,शिरोळ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पुढील पाच वर्षांचा सविस्तर विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. नागरिकांच्या मूलभूत गरजा लक्षात घेऊन टप्प्याटप्प्याने सर्व कामे पूर्ण केली जातील.सुरुवातीला उपलब्ध निधीतून शंभर दिवसांचा विशेष विकास आराखडा राबविण्यात येणार असून आगामी पाच वर्षांत सुमारे पाचशे कोटी रुपयांची विकासकामे पूर्ण करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

Leave a Comment

error: Content is protected !!