‘दहा प्रभाग, एक संकल्प जलकलश’ उपक्रमातून शिरोळ नगरपालिकेत लोकसेवेचा नवा प्रारंभ

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

शिरोळ नगरपालिकेच्या दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीत शिव- शाहू आघाडी प्रणित यादव पॅनेलने एकहाती सत्ता मिळवल्यानंतर बुधवारी नगरपालिकेत लोकशाही पद्धतीने नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा पार पडला. यावेळी “दहा प्रभाग, एक संकल्प जलकलश” या अभिनव उपक्रमातून शिरोळ शहराच्या सर्वांगीण विकासाचा आणि स्वच्छ, मुबलक पिण्याच्या पाण्याचा संकल्प करण्यात आला.यादव पॅनेलच्या नूतन लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.योगिता सतीश कांबळे यांच्यासह सर्व नगरसेवकांनी पदभार स्वीकारला.मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव,नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी नूतन लोकप्रतिनिधींचे स्वागत केले.यावेळी यादव पॅनेलचे प्रमुख पृथ्वीराजसिंह यादव यांनी प्रशासन अधिकारी,कर्मचारी व पत्रकारांशी संवाद साधत यादव पॅनेलला भरभरून साथ देणाऱ्या जनतेप्रती कृतज्ञता व्यक्त केली.पदग्रहण सोहळ्याच्या प्रारंभी नगराध्यक्षा योगिता कांबळे व नगरसेवकांनी पंचायत समिती कार्यालय परिसरातील महापुरुषांच्या पुतळ्यास तसेच छत्रपती ताराराणी तख्त येथे पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.त्यानंतर माजी आमदार कै.दिनकररावजी यादव यांच्या पुतळ्यास अभिवादन करून साध्या आणि लोकाभिमुख पद्धतीने नगरपालिकेत पदभार स्वीकारण्यात आला. नगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारात नगराध्यक्षा योगिता कांबळे यांच्यासह महिला नगरसेविका,लोकप्रतिनिधी व विद्यार्थ्यांनी १ ते १० प्रभागांतील जलकलश आणले.जोत्सना यादव व देविका मोरे यांनी औक्षण करून ११ जलकलशांचे स्वागत केले. “आजचा संकल्प उद्याचे शिरोळ”,“प्रत्येक घरापर्यंत विकास”, “जनतेचा विश्वास – प्रशासनाची जबाबदारी”, “पाण्यापासून जीवन, जीवनातून विकास” अशा घोषवाक्यांतून नागरिकांमध्ये प्रबोधनाचा संदेश देण्यात आला.नगरपालिका सभागृहात मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव व माजी सरपंच सुवर्णा कोळी यांच्या उपस्थितीत नगराध्यक्षा व नगरसेवकांनी औपचारिक पदभार स्वीकारला.यावेळी शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ व पेढे देऊन लोकप्रतिनिधी आणि मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी यादव पॅनेलचे प्रमुख पृथ्वीराजसिंह यादव म्हणाले हा प्रवेश सत्तेचा नसून लोकसेवेचा,समतेचा आणि जबाबदारीचा आहे.यादव पॅनेलला मिळालेली एकहाती सत्ता म्हणजे जनतेच्या अपेक्षांची पावती आहे.प्रत्येक प्रभागातून आणलेला जलकलश हा नागरिकांच्या समस्या,अपेक्षा आणि नागरी हक्कांचे प्रतीक आहे. जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही आणि शिरोळ शहराच्या विकासासाठी कटिबद्ध राहू.या सोहळ्यास दत्त कारखान्याचे संचालक दरगु गावडे, पंचगंगा साखर कारखान्याचे संचालक प्रताप उर्फ बाबा पाटील, माजी सरपंच अविनाश कांबळे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, यादव पॅनेलचे कार्यकर्ते, नगरपालिका कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान,पत्रकार दिनानिमित्त आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी शिरोळ शहर व परिसरातील पत्रकारांचा तसेच कुंभार समाज संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.

Leave a Comment

error: Content is protected !!