वृत्ताची दखल शिरोळ नगरपरिषद प्रशासनाकडून कचरा उठाव, नागरिकातून समाधान व्यक्त 

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

शिरोळ शहरात जागोजागी साचलेल्या कचऱ्यामुळे निर्माण झालेल्या दुर्गंधीने नागरिक हैराण झाले होते.अनेक प्रभागांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून कचरा उचलला जात नसल्याने रस्त्यांच्या कडेला कचऱ्याचे ढीग साचले होते.कुजलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरून डास व माशांचा प्रादुर्भाव वाढला होता. या गंभीर परिस्थितीमुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात होता.दरम्यान, “लोकप्रतिनिधी सत्कारात व्यस्त; नागरिक कचऱ्याच्या दुर्गंधीने त्रस्त” या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध झाले होते.या वृत्ताची दखल घेत शिरोळ नगरपरिषद प्रशासनाने अखेर शहरातील कचरा उठावास सुरुवात केली आहे.त्यामुळे अनेक दिवसांपासून दुर्गंधीमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.शिरोळ नगरपरिषद क्षेत्रातील अनेक प्रभागांमध्ये कचरा व्यवस्थापन, स्वच्छता व पाणीपुरवठा या मूलभूत नागरी समस्यांकडे पूर्वीच्या राजर्षी शाहू विकास आघाडीच्या काळात सातत्याने दुर्लक्ष झाले होते.याच पार्श्वभूमीवर नगरपरिषद निवडणुकीत मतदारांनी बदलाचा कौल देत शिव-शाहू पुरस्कृत यादव पॅनेलला एकहाती सत्ता दिली. नवीन सत्ताधाऱ्यांकडून तातडीने स्वच्छता,कचरा व्यवस्थापन आणि पाणीपुरवठा सुधारण्याची अपेक्षा नागरिकांना होती.मात्र, निवडणुकीनंतर अनेक लोकप्रतिनिधी सत्कार, अभिनंदन समारंभ व भेटीगाठींमध्ये व्यस्त असल्याने शहरातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिकांनी केला होता.सत्ता बदलली,पण परिस्थिती जैसे थेच आहे अशी प्रतिक्रिया अनेक नागरिकांतून उमटत होती.या अस्वच्छतेचा सर्वाधिक त्रास शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना सहन करावा लागत होता.वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर नगरपरिषद प्रशासनाने तातडीने हालचाली करत शहरातील कचरा उठाव सुरू केला.त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त करत लोकप्रतिनिधी व नगरपरिषद प्रशासनाचे आभार मानले आहेत. भविष्यात कचरा उठाव नियमित करावा,शहर स्वच्छ ठेवावे आणि नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ठोस उपाययोजना कराव्यात,अशी अपेक्षा ज्येष्ठ नागरिकांसह शहरवासीयांतून व्यक्त होत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!