ऊस उत्पादन वाढीसाठी तंत्रज्ञान महत्त्वाचे, मात्र शेतकऱ्यांना दरवाढीचीही अपेक्षा – धनाजी चुडमुंगे

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

दत्त साखर कारखाण्याच्या संपूर्ण टीमने एकरी तब्बल ४०० टन ऊस उत्पादन घेणाऱ्या पुणे येथील प्लॉटला नुकतीच भेट दिल्याच्या बातम्या वाचनात आल्या आहेत.ऊसाचे उत्पादन वाढवण्यासाठी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे, याबाबत दुमत असण्याचे कारण नाही. उत्पादन वाढल्यासच साखर कारखाने भविष्यात अधिक काळ सक्षमपणे चालू राहू शकतील, असे मत आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी व्यक्त केले आहे.आजच्या घडीला राज्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी गरज नसतानाही गाळप क्षमता वाढवलेली आहे. मात्र या कारखान्यांमध्ये ऊसाशिवाय इतर कोणत्याही पिकाचे गाळप होत नाही.त्यामुळे कारखान्यांना कोणत्याही परिस्थितीत ऊस लागतोच. अशा परिस्थितीत कारखानदारांनी ऊस उत्पादन वाढीच्या दृष्टीने माहिती घेणे योग्यच आहे,असेही चुडमुंगे यांनी स्पष्ट केले.तथापि, पुण्यापर्यंत गेलेली ही टीम जर आणखी थोडे पुढे जाऊन गुजरातमधील गणदेवी साखर कारखान्याला भेट दिली असती, तर कारखान्याच्या सर्व सभासद शेतकऱ्यांना अधिक आनंद झाला असता,असे उपरोधिक मत त्यांनी मांडले.गणदेवी कारखान्यात ऊस उत्पादन वाढीबरोबरच शेतकऱ्यांना ऊसाला अधिक दर कसा देता येतो,याचेही उत्तम व्यवस्थापन आहे.पुढील हंगामात गुजरातप्रमाणे ४४०० रुपये दर देणे शक्य नसेल,तरी किमान ४००० रुपये प्रति टन दर तरी शेतकऱ्यांना मिळावा,अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कारखानदार म्हणून दत्त कारखाण्याच्या संचालकांनी उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करणे योग्य असले,तरी शेतकऱ्यांच्या उसाला जादा दर देण्यासाठी नेमके काय केले पाहिजे,हे जाणून घेण्याची त्यांची इच्छा दिसून येत नाही, असा टोला देखील चुडमुंगे यांनी शेवटी लगावला.ऊस उत्पादन वाढीसोबतच शेतकऱ्यांच्या आर्थिक हिताकडेही तितकेच लक्ष देणे गरजेचे असून,तेव्हाच साखर उद्योग आणि शेतकरी यांचा समतोल विकास साधता येईल, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!