शिरोळ / प्रतिनिधी
कर्तव्यात कसूर आणि प्रशासकीय कामकाजात दिरंगाई केल्याच्या तक्रारीवरून सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेले शिरोळ नगरपालिकेचे मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांची अखेर पुन्हा याच पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. बुधवारी त्यांनी अधिकृतपणे शिरोळ नगरपालिकेचा पदभार स्वीकारला. शासनाच्या आदेशानंतर ही नियुक्ती करण्यात आल्याने नगरपालिकेच्या प्रशासकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.सुमारे सहा महिन्यांपूर्वी प्रशासकीय कामकाजात आवश्यक ती तत्परता न दाखवणे तसेच कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत मुख्याधिकारी प्रचंडराव यांच्यावर कारवाई करण्यात आली होती.त्या वेळी त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश देण्यात आले होते.त्यांच्या अनुपस्थितीत शिरोळ नगरपालिकेचा अतिरिक्त कार्यभार हुपरी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आला होता. त्यामुळे अनेक विकासकामे आणि प्रशासकीय निर्णय प्रक्रियेवर परिणाम झाल्याची चर्चा नागरिकांत होती.दरम्यान, संबंधित प्रकरणाची प्रशासकीय चौकशी आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शासनाने पुन्हा एकदा निशिकांत प्रचंडराव यांची शिरोळ नगरपालिकेच्या मुख्याधिकारीपदी नियुक्ती करण्याचे आदेश दिले.या आदेशानुसार बुधवारी त्यांनी नगरपालिकेत हजर होत अधिकृतपणे पदभार स्वीकारला.पदभार स्वीकारल्यानंतर मुख्याधिकारी प्रचंडराव यांनी तात्काळ नगरपालिकेच्या सत्ताधारी गटाचे नेते तसेच यादव पॅनेलचे प्रमुख नगरसेवक पृथ्वीराजसिंह यादव आणि शिरोळ नगरपालिकेच्या प्रथम लोकनियुक्त महिला नगराध्यक्षा सौ. योगिता कांबळे यांची भेट घेतली.या भेटीदरम्यान नगरपालिकेच्या सध्याच्या कामकाजाची स्थिती,रखडलेली विकासकामे,प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमधील समन्वय तसेच आगामी नियोजन याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.मुख्याधिकारी प्रचंडराव यांच्या पुनरागमनामुळे नगरपालिकेच्या प्रशासकीय कामकाजाला गती मिळेल,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.तसेच नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्न मार्गी लागावेत,यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी मिळून काम करतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.