मौजे वडगांव येथील खाजगी सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम तात्काळ थांबवावे जिल्हाधिकारी यांना निवेदन

Spread the love
पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे 
मौजे वडगांव ता.हातकणंगले येथे सुरू असलेले खाजगी सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम ग्रामसभेच्या ठरावांना व संपूर्ण गावाच्या विरोधाला डावलून सुरू आहे.हे काम तात्काळ थांबवावे या मागणीचे जिल्हाधिकारी अमोल ऐडगे यांना मौजे वडगाव गायरान बचाव समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.या निवेदनात म्हटले आहे की मौजे वडगांव ता हातकणंगले येथील गट नंबर ५१२ मधील अकरा हेक्टर जमीन हि खाजगी कंपनीमार्फत प्रस्तावित सौर ऊर्जा प्रकल्पास गावकऱ्यांचा व ग्रामपंचायतचा तसेच गावात घेण्यात आलेल्या ग्रामसभेमध्ये सुरुवातीपासूनच तीव्र विरोध दर्शविण्यात आला आहे. या संदर्भात गावात आजपर्यंत सलग तीन वेळा ग्रामसभा घेण्यात आलेल्या असून, प्रत्येक ग्रामसभेत या प्रकल्पास स्पष्ट व लेखी विरोध नोंदवण्यात आलेला आहे.२०२३ ला गावातील हनुमान मंदिर येथे घेण्यात आलेल्या ग्रामसभेत ४९० ग्रामस्थांनी सहभाग नोंदवला होता. या ग्रामसभेत ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांनी स्पष्टपणे सांगितले की,गावाच्या अस्तित्वास, पर्यावरणास व गायरान जमिनीला धोका निर्माण करणारा कोणताही प्रकल्प गावात मंजूर केला जाणार नाही असा ठराव करण्यात आला होता पण गावकऱ्यांना कोणतीच कल्पन न देता हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे .कंपनी प्रतिनिधींनी गावच्या हिताची तोंडी आश्वासने दिली असली, तरी कोणतीही लिखित हमी, अधिकृत करार किंवा शासनाची परवानगी ग्रामसभेस सादर करण्यात आलेली नाही. त्यामुळे कोणतेही काम सुरू करू देणार नाही, असा एकमताने ठराव ग्रामसभेत घेण्यात आला होता यानंतरही घेण्यात आलेल्या दोन ग्रामसभेत सुद्धा सौर ऊर्जा प्रकल्पास तीव्र विरोध दर्शविण्यात आला असून, त्याचे ठराव ग्रामसभेच्या अधिकृत नोंदीत आहेत. अत्यंत गंभीर बाब अशी की, वरील सर्व ग्रामसभा ठराव, संपूर्ण गावाचा विरोध व कोणतीही स्पष्ट ग्रामसभा संमती नसताना हा सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम सध्या सुरू करण्यात आलेले आहे. हे काम सुरु ठेवणे म्हणजे ग्रामसभेच्या अधिकारांना, लोकशाही प्रक्रियेला व ग्रामस्थांच्या हक्कांना सरळसरळ डावलण्याचा प्रकार आहे.याबाबत दिनांक 22/12/2025 रोजी गावातील सर्व लोकांनी सामूहिक बैठक घेऊन लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे.या प्रकल्पाला गावातील एकही घटक, एकही ग्रामस्थ, एकही जमीनधारक पाठिंबा देत नाही, ही बाब आम्ही ठामपणे अधोरेखित करीत आहोत. तरी आपण या प्रकरणात तात्काळ हस्तक्षेप करून मौजे वडगाव येथे सुरू असलेला सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम तात्काळ बंद करावे व ग्रामसभेच्या विरोधी ठरावांचा सन्मान राखून कोणतेही काम पुढे सुरू राहणार नाही याबाबत स्पष्ट आदेश द्यावेत व ग्रामसभेची लेखी व वैध संमती मिळेपर्यंत तसेच सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कोणतेही काम करण्यास मज्जाव करावा, अशी तातडीची मागणी गावाच्या वतीने करीत आली ग्रामसभेच्या ठरावांकडे दुर्लक्ष करून काम सुरू ठेवले गेल्यास उद्भवणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीस प्रशासन व संबंधित कंपनी संपूर्णपणे जबाबदार राहील, असा स्पष्ट इशारा गायरान बचाव समितीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात देण्यात आला आहे .
यावेळी माजी सरपंच काशिनाथ कांबळे, वृषभबाथ पाटील , उमाजी जाधव , महेश कांबरे, आनंत जाधव , राजकुमार थोरवत , संतोष लोंढे, आलीम हजारी, हमजेखान हजारी, अर्जुन यादव , रंगराव गोरड, गुलाब मुल्लाणी, आदिसह गायरान बचाव समितीचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते .

Leave a Comment

error: Content is protected !!