शिरोळ / प्रतिनिधी
शिरढोण (ता.शिरोळ) येथे साहित्य परिषद बहुद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेले ‘संवाद साहित्य संमेलन’ अत्यंत उत्साही आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडले. साहित्य,समाज आणि संवेदनशीलतेचा सुरेख संगम या संमेलनात अनुभवायला मिळाला. या संमेलनाचे खास वैशिष्ट्य म्हणजे साहित्याबरोबरच सामाजिक कार्याचा सन्मान करण्यात आला.या वर्षीचा मानाचा ‘सामाजिक पुरस्कार’ शिरोळ तालुक्यातील वजीर रेस्क्यू फोर्स या संस्थेला त्यांच्या अतुलनीय व निस्वार्थ सामाजिक कार्याबद्दल प्रदान करण्यात आला. विविध संकटांच्या काळात समाजासाठी झटणाऱ्या या संस्थेच्या कार्याची साहित्य परिषद बहुद्देशीय संस्थेने विशेष दखल घेतली.वजीर रेस्क्यू फोर्स गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सातत्याने सक्रिय आहे.नैसर्गिक आपत्ती,अपघात,आपत्कालीन परिस्थिती अशा विविध प्रसंगी ही संस्था मदतीसाठी धावून जाते. विशेषतः कोरोना महामारीसारख्या जागतिक संकटाच्या काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नागरिकांना मदत करण्यासाठी या संस्थेच्या स्वयंसेवकांनी धाडसी पावले उचलली होती.तसेच शिरोळ तालुक्यात दरवर्षी उद्भवणाऱ्या महापुराच्या काळात अनेक अडकलेल्या नागरिकांचे प्राण वाचवणे,त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवणे,तसेच प्रशासनाला मदत करणे या कार्यात वजीर रेस्क्यू फोर्स नेहमीच अग्रभागी राहिली आहे.त्यांच्या या कार्यामुळे अनेक कुटुंबांना नवे जीवन मिळाले आहे.संमेलनात साहित्यिक,विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.साहित्यिक चर्चांसोबतच समाजासाठी काम करणाऱ्या खऱ्या हिरोंचा सन्मान झाल्याने उपस्थितांमध्ये समाधानाचे वातावरण होते.वजीर रेस्क्यू फोर्सच्या सन्मानामुळे संमेलनाला वेगळीच उंची मिळाली.साहित्य आणि समाजसेवा यांचा सुंदर मेळ घालणारा हा सोहळा शिरढोण नगरीत चर्चेचा विषय ठरला असून,वजीर रेस्क्यू फोर्सच्या कार्याबद्दल सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.