प्रभाग ४ मधील पराभव मोरे कुटुंबाच्या जिव्हारी, यादव पॅनेलच्या आघाडीतील बिघाडीची राजकीय वर्तुळात चर्चा

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

प्रभाग क्रमांक ४ मधील नगरसेवक निवडणुकीचा निकाल यादव पॅनेलसाठी धक्कादायक ठरला आहे.अपक्ष उमेदवार श्वेता संतोष जाधव यांनी विजय मिळवत सर्वच राजकीय आघाड्यांना मागे टाकले.शिव – शाहू आघाडी पुरस्कृत यादव पॅनेलकडून निवडणूक लढवणाऱ्या वर्षा रुपेश मोरे यांचा केवळ १२३ मतांनी पराभव झाला असून हा पराभव मोरे कुटुंबासाठी जिव्हारी लागणारा ठरला आहे.या प्रभागात ताराराणी आघाडीकडून शारदा माने, राजर्षी शाहू आघाडीकडून साधना माने तर अपक्ष म्हणून अनिता अवधूत पाटील देसाई या महिला उमेदवार रिंगणात होत्या.त्यामुळे लढत चुरशीची झाली होती.मात्र अखेर अपक्ष श्वेता जाधव यांनी बाजी मारत प्रभागावर आपले वर्चस्व सिद्ध केले.विशेष बाब म्हणजे यादव पॅनेलकडूनच उभे असलेले विजय वसंत आरगे यांनी याच प्रभागात तब्बल १११४ मते घेतली. मात्र त्याच पॅनेलच्या वर्षा रुपेश मोरे यांना केवळ ५६० मते मिळाल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.विजय आरगे यांच्या प्रभावी भागातही श्वेता जाधव यांना अधिक मते मिळाल्याने यादव पॅनेलमधील अंतर्गत समन्वयावर संशय व्यक्त केला जात आहे.यामुळेच वर्षा मोरे यांच्या पराभवामागे आघाडीतील बिघाडी कारणीभूत आहे का,की काही कार्यकर्त्यांनी अंतर्गत नाराजीमुळे वेगळी भूमिका घेतली,याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.मोरे कुटुंबीयांनीही या निकालाबाबत नाराजी व्यक्त केली असून, अपेक्षित मतांची साथ न मिळाल्याची भावना उघडपणे व्यक्त होत आहे.दरम्यान,या संपूर्ण प्रकरणावर यादव पॅनेलचे प्रमुख पृथ्वीराजसिंह यादव कोणती भूमिका आणि आगामी राजकीय समीकरणांमध्ये बदल होणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.प्रभाग ४ मधील हा निकाल यादव पॅनेलसाठी आत्मपरीक्षणाची वेळ असल्याचेही राजकीय जाणकारांचे मत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!