शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ नगर परिषदेवर शिव – शाहू पुरस्कृत यादव आघाडीची एकहाती सत्ता स्थापन झाल्यानंतर शहरातील अनेक ठेकेदारांचे धाबे दणाणले असल्याचे चित्र दिसून येत आहे.नगर परिषदेतील कथित भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर आघाडीचे प्रमुख पृथ्वीराजसिंह यादव यांनी निवडणूक प्रचारादरम्यान प्रशासन तसेच तत्कालीन लोकप्रतिनिधींवर जोरदार हल्लाबोल केला होता.याच पार्श्वभूमीवर शिरोळ नगर परिषदेची निवडणूक अत्यंत रंगतदार बनली होती.शहरात मागील काळात कोट्यवधी रुपयांची विविध विकासकामे झाली असून,या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे आरोप पृथ्वीराजसिंह यादव यांनी केले होते. रस्ते,गटारी,पाणीपुरवठा,कचरा व्यवस्थापन आदी कामांमध्ये निकृष्ट दर्जा,वाढीव खर्च आणि अपूर्ण कामे याबाबत नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष होता.या असंतोषाला वाट करून देत यादव आघाडीने ‘भ्रष्टाचारमुक्त नगरपरिषद’ हा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून निवडणूक लढवली.या मुद्द्याला शिरोळच्या सुज्ञ नागरिकांनी भरघोस प्रतिसाद देत पृथ्वीराजसिंह यादव यांच्या नेतृत्वाखालील शिव – शाहू पुरस्कृत यादव आघाडीला मोठ्या मताधिक्याने विजयी केले.नागरिकांनी दिलेल्या या स्पष्ट जनादेशामुळे नगरपरिषदेत सत्तांतर झाले असून,नव्या सत्ताधाऱ्यांकडून आता ठोस कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.सत्तेवर आल्यानंतर येणाऱ्या काळात कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवर पृथ्वीराजसिंह यादव नेमकी कोणती भूमिका घेणार,तसेच दोषींवर चौकशी व कारवाई होणार का,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.शिरोळच्या जनतेने दाखवलेला विश्वास हा केवळ शब्दांत न राहता प्रत्यक्ष कृतीतून दिसून यावा,अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. दरम्यान,यादव आघाडी सत्तेत आल्यानंतर नगरपरिषदेत पारदर्शक कारभार,दर्जेदार विकासकामे आणि भ्रष्टाचारावर अंकुश ठेवला जाईल असा विश्वास शिरोळवासीयांकडून व्यक्त करण्यात येत आहे.आता येणारा काळ हा या विश्वासाची कसोटी पाहणारा ठरणार आहे.