कुरुंदवाड / प्रतिनिधी
कुरुंदवाड येथील सुप्रसिद्ध विधिज्ञ, सामाजिक कार्यकर्ते व प्रभावी वक्ते ॲड.ममतेश आवळे यांना सन २०२५–२६ या वर्षातील प्रतिष्ठेचा ‘सूर्यपुत्र यशवंत ऊर्फ भैय्यासाहेब आंबेडकर’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.भारतीय बौद्ध महासभा तर्फे देण्यात येणारा हा मानाचा पुरस्कार बुद्ध, शिव,शाहू, फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर आधारित चळवळीत ॲड.आवळे यांनी दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल प्रदान करण्यात येणार आहे.ॲड.ममतेश आवळे यांनी आपल्या विधिज्ञ कारकिर्दीत आजपर्यंत अनेक निरपराध व अन्यायग्रस्त नागरिकांना न्याय मिळवून दिला आहे.सामाजिक न्याय, संविधानिक मूल्ये व मानवाधिकार यासाठी त्यांनी सातत्याने लढा दिला आहे. उत्कृष्ट वक्ते म्हणून त्यांनी शिव,फुले,शाहू, आंबेडकर, बसवेश्वर आदी महापुरुषांच्या विचारांवर तसेच सामाजिक, शैक्षणिक व संविधानिक विषयांवर महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात २ हजारांहून अधिक व्याख्याने दिली आहेत. यासोबतच विविध विषयांवर त्यांचे लेखन कार्यही सुरू आहे.ॲड.आवळे यांना आतापर्यंत ३ राष्ट्रीय व ३२ राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.संविधान सन्मान परिषदचे त्यांनी यशस्वी आयोजन केले असून ते या परिषदेचे निमंत्रकही आहेत.त्यांच्या या सर्व कार्याची दखल घेऊन हा मानाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.ही माहिती भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष राजेंद्र भोसले, चिटणीस संतोष भुयेकर, कोषाध्यक्ष सतीश माणगावकर, ऑडिटर सुरेश सिद्धार्थ, तालुका अध्यक्ष बबन कांबळे व समता सैनिक दलाचे सचिव नितीन शिंगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.या निवडीमुळे जिल्हाभरातून विविध मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते व आंबेडकरी चळवळीतील पदाधिकाऱ्यांकडून ॲड.ममतेश आवळे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.सदर पुरस्कार वितरण सोहळा ३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता कोल्हापूर येथील शाहू स्मारक येथे संपन्न होणार असून या कार्यक्रमास आंबेडकर चळवळीतील पदाधिकारी व बहुसंख्य कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे,असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.