अंकली – चोकाक ३३ किमी टप्प्यातील शेतकऱ्यांना अखेर चौपट दराने भरपाई;  महामार्ग अन्याय निवारण कृती समितीच्या लढ्याला यश

Spread the love

जयसिंगपूर / प्रतिनिधी

रत्नागिरी – नागपूर महामार्गाच्या कामामुळे बाधित झालेल्या शिरोळ व हातकणंगले मतदारसंघातील शेतकऱ्यांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे.अंकली ते चोकाक या सुमारे ३३ किलोमीटरच्या टप्प्यातील जमीनधारक शेतकऱ्यांना चौपट दराने नुकसान भरपाई देण्यास शासनाने मंजुरी दिली असून,यामुळे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली दीर्घकाळ सुरू असलेल्या आंदोलनाला यश आले असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग अन्याय निवारण कृती समिती अध्यक्ष विक्रम पाटील यांनी दिली आहे.विक्रम पाटील पुढे म्हणाले महामार्गाच्या बहुतांश टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांना चौपट दराने मोबदला देण्यात आला होता.मात्र अंकली – चोकाक या टप्प्यातील शेतकऱ्यांना केवळ दुप्पट दराने भरपाई देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. या अन्यायकारक निर्णयामुळे या भागातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला होता. शेती, विहिरी तसेच इतर मालमत्ता बाधित होऊनही समान न्याय मिळत नसल्याने शेतकरी संतप्त झाले होते.या अन्यायाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन छेडण्यात आले.वेळोवेळी मोर्चे,रास्ता रोको,महामार्गाचे काम बंद पाडणे, मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यांना काळे झेंडे दाखवणे, तसेच सरकारच्या निषेधार्थ भूमी अभिलेख कार्यालयात शासनाच्या नावे श्राद्ध घालणे अशी विविध आंदोलने करण्यात आली. माजी खासदार राजू शेट्टी यांनी बाधित शेतकऱ्यांसाठी लढा तीव्र करत “ रत्नागिरी – नागपूर महामार्ग रद्द करा” अशी ठाम भूमिका घेतली होती. यासोबतच त्यांनी शासन स्तरावरही हा विषय प्रभावीपणे मांडत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला.इतर भागात चौपट दर मिळत असताना शिरोळ व हातकणंगलेतील शेतकऱ्यांना दुप्पट दर देणे हा गंभीर अन्याय असल्याचे त्यांनी स्पष्टपणे मांडले होते.अखेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पाठपुराव्याला यश आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंकली – चोकाक ३३ किमी टप्प्यातील शेतकऱ्यांना चौपट दराने नुकसान भरपाई देण्यास मंजुरी दिली आहे. या भागात एकूण ९३७ खातेदार असून, दुप्पट दराने त्यांना केवळ ९४ कोटी रुपये मिळाले असते.मात्र आता चौपट दराने सुमारे १७१ कोटी रुपये मिळणार असून,शेतकऱ्यांना जवळपास ७६ कोटी रुपयांचा अतिरिक्त लाभ होणार आहे.या निर्णयामुळे बाधित शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत असून, दीर्घकाळ चाललेल्या संघर्षाला अखेर न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!