भेंडवडे / प्रतिनिधी
भेंडवडे (ता.हातकणंगले) येथील ओढ्यात शरद सहकारी साखर कारखान्याचे मळी मिश्रित पाणी सोडले जात असल्याने गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. ओढ्यातील हे दूषित पाणी थेट वारणा नदीत मिसळत असल्याने नदीवर आधारित पाणीपुरवठा तसेच ओढ्यालगत असलेल्या विहिरी व बोअरचे पाणीही दूषित झाले होते. त्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य,जनावरे आणि शेती यांचे मोठे नुकसान होत होते.या गंभीर प्रकाराबाबत भेंडवडे ग्रामपंचायतीच्या वतीने गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून शरद सहकारी साखर कारखान्याच्या प्रशासनाकडे वारंवार निवेदने देण्यात आली होती.मात्र कारखाना प्रशासनाने याकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आज नरंदे येथील शरद सहकारी साखर कारखान्यावर भव्य मोर्चा काढला.मोर्चा कारखान्याच्या प्रवेशद्वाराजवळ आल्यानंतर ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला.पोलिसांनी मोर्चेकरांना गेटवर अडवले असता परिस्थिती चिघळली आणि संतप्त जमावाने कारखान्यावर दगडफेक केली.घटनेची माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर यांच्यासह हातकणंगले पोलीस,जलद कृती दल घटनास्थळी दाखल झाले.यानंतर माजी सरपंच काकासाहेब चव्हाण,विजय माने,हनुमंत पवार, संग्राम माने,नयुम पठाण यांच्या प्रतिनिधी मंडळासह कारखान्याचे कार्यकारी संचालक बाळासाहेब आवटी,तहसीलदार सुशील कुमार बेल्हेकर,प्रदूषण महामंडळाचे अधिकारी ए.आर. पाटील,पोलीस अधिकारी यांच्यात बैठक झाली.अखेर कारखाना प्रशासनाने मळी मिश्रित पाणी सोडणे तात्काळ बंद करण्याबाबत लेखी पत्र दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.दरम्यान, ग्रामस्थांच्या वतीने आंदोलकांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी महावीर कांबळे,शशिकांत माने,अमोल निकम,विजय अपराध,राजू कोळी, डॉ. संजय देसाई, विनोद देसाई, हनुमंत पाटील, प्रमोद देसाई, शांतिनाथ देसाई यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.