शिरढोणचे पर्यावरण रक्षण चळवळ प्रमुख विश्वास पारीसा बालीघाटे यांना राज्यस्तरीय ‘पर्यावरण रक्षक जनहित पुरस्कार’

Spread the love

शिरढोण / प्रतिनिधी 

शिरढोण येथील प्रदूषण मुक्त चळवळीचे प्रमुख आणि ज्येष्ठ पर्यावरण कार्यकर्ते विश्वास पारीसा बालीघाटे यांना अखिल भारतीय जनहित पार्टीच्या वतीने मानाचा राज्यस्तरीय ‘पर्यावरण रक्षक जनहित पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे.पर्यावरण रक्षण ही आजच्या काळातील सर्वात मोठी गरज असून, हवा, पाणी आणि जमीन वाचवण्यासाठी स्वतःच्या सुखाचा त्याग करून उभी केलेली चळवळ येणाऱ्या पिढीचे भविष्य सुरक्षित करते, या त्यांच्या कार्याची दखल घेत हा सन्मान देण्यात येत आहे.विश्वास बालीघाटे यांनी अवघ्या २२ व्या वर्षापासून सामाजिक कार्याला सुरुवात केली.गेली २५ वर्षे पंचगंगा नदीच्या प्रदूषणमुक्तीसाठी त्यांनी अखंड लढा दिला आहे. या कालावधीत त्यांनी पर्यावरण संरक्षणासाठी पाच आमरण उपोषणे, सुमारे ३०० मोर्चे आणि ४५० ठिय्या आंदोलने केली. तन, मन आणि धन अर्पण करून त्यांनी सहकाऱ्यांसह कृतीशील आंदोलन उभे केले. नदी प्रदूषण,औद्योगिक सांडपाणी, प्लास्टिकमुक्ती, वृक्षसंवर्धन यांसारख्या विषयांवर त्यांनी सातत्याने जनजागृती केली आहे.या उल्लेखनीय कार्याला आणखी बळ देण्यासाठी अखिल भारतीय जनहित पार्टीच्या वतीने हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. पुरस्कार वितरण सोहळा दिनांक २५ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १ वाजता छत्रपती शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे मोठ्या दिमाखात पार पडणार आहे. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील दिग्गज मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.सदर निवड पत्रावर अखिल भारतीय जनहित पार्टीचे संस्थापक कृष्णात दादासो पाटील, पक्षाचे सचिव दत्तात्रय वसंतराव पाटील तसेच पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष प्रमोद कांबळे आनुरकर यांच्या सह्या आहेत. या सोहळ्यास बालीघाटे यांनी सहकुटुंब, सहपरिवार उपस्थित राहून हा पुरस्कार सन्मानपूर्वक स्वीकारावा, अशी नम्र विनंती आयोजकांच्या वतीने करण्यात आली आहे. पर्यावरण रक्षणासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी हा सन्मान प्रेरणादायी ठरणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!