शिरोळ / प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर होत असताना शिरोळ नगरपरिषदेचा निकाल जिल्ह्याच्या राजकारणात सर्वाधिक चर्चेचा ठरला आहे.आमदार अशोकराव माने यांना त्यांच्याच होमपीचवर मोठा राजकीय धक्का बसला असून मतदारांनी त्यांच्या कुटुंबाला स्पष्ट नकार दिला आहे.या निकालामुळे स्थानिक सत्ताबदलासोबतच जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्येही महत्त्वाचा बदल झाल्याची चर्चा सुरू आहे.शिरोळ नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणाऱ्या आमदार अशोकराव माने यांच्या सूनबाई सौ.सारिका अरविंद माने यांचा दारुण पराभव झाला आहे.त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक दोन मधून नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवणारे त्यांचे पुत्र अरविंद अशोकराव माने यांनाही मतदारांनी नाकारले आहे.स्थानिक राजकारणात प्रभावी मानल्या जाणाऱ्या माने कुटुंबाच्या घराणेशाहीला या निकालाने जोरदार धक्का दिल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.मतदारांनी नातेसंबंधांपेक्षा नेतृत्व,कामगिरी आणि बदलाला प्राधान्य दिल्याचा स्पष्ट संदेश या निकालातून मिळत असल्याचे सांगितले जात आहे.शिरोळ नगरपरिषद निवडणुकीत शिव शाहू आघाडी पुरस्कृत यादव पॅनेलने दणदणीत विजय मिळवला आहे. सौ.योगिता कांबळे या नगराध्यक्षा म्हणून विजयी झाल्या असून त्यांच्या पॅनेलचे तब्बल 15 नगरसेवक निवडून आले आहेत.यामुळे शिरोळ नगरपरिषदेतील सत्ताधारी राजर्षी शाहू विकास आघाडीची सत्ता संपुष्टात आली आहे.राजर्षी शाहू विकास आघाडीला केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले असून माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील हे प्रभाग क्रमांक नऊमधून विजयी झाले आहेत.उर्वरित दोन जागांवर अपक्ष उमेदवारांनी बाजी मारली आहे.दरम्यान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांची एकहाती सत्ता असलेल्या शिरोळ नगरपरिषद मध्ये सत्तांतर झाले असून हा निकाल केवळ स्थानिक राजकारणापुरता मर्यादित न राहता कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणातील एक महत्त्वाचा टर्निंग पॉइंट मानला जात आहे.