अतिग्रे / प्रतिनिधी
अतिग्रे येथील नामांकित महाविद्यालयात धक्कादायक घटना घडली असून,स्टंट करताना एका विद्यार्थ्याचा तोल जाऊन तो थेट दुसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने गंभीर जखमी झाला आहे.या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित विद्यार्थी कॉलेज सुटल्यानंतर इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील पायऱ्यांच्या कठड्याजवळ असलेल्या ग्रिलवर बसून घसरत जाण्याचा स्टंट करत होता.मात्र हा स्टंट त्याच्या अंगावरच आला.संतुलन बिघडल्याने तो थेट खाली कोसळला.पडताना त्याला गंभीर दुखापत झाली असून डोक्याला आणि शरीराच्या इतर भागांना मार लागल्याचे समजते.घटनेनंतर कॉलेज प्रशासन व सहकाऱ्यांनी तातडीने त्याला उपचारासाठी नजीकच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.मात्र विद्यार्थी बेशुद्ध अवस्थेत असल्याने आणि प्रकृती गंभीर असल्यामुळे पुढील उपचारांसाठी त्याला सांगली येथील एका खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सध्या त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर दिली आहे.दरम्यान, या घटनेबाबत कॉलेज प्रशासनाने मोठी खबरदारी घेतल्याचे दिसून येत असून, कॉलेजचे नाव बदनाम होऊ नये या भीतीपोटी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.घटनेची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नसून,कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी महाविद्यालयीन परिसरात योग्य ती खबरदारी घेतली जाते का ? तसेच अशा धोकादायक प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाची भूमिका काय तसेच शासकीय ग्रामीण रूग्णालयामध्ये जर जखमी रुग्ण आला तर पोलीस स्टेशन मध्ये कळकवणे बंधनकारक असते परंतु सर्व कायदे नियम सर्वसामान्य नागरिकांना फक्त लागू आहे.त्यामुळे रुग्णालय प्रशासनावर याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.या प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची मागणी पालक व नागरिकांकडून होत आहे.