निवडणूक आचारसंहितेचा भंग : जयसिंगपूरमध्ये विनापरवाना डिजिटल फलक प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Spread the love

जयसिंगपूर / प्रतिनिधी 

निवडणूक आचारसंहिता लागू असताना विनापरवाना डिजिटल फलक उभारून नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी जयसिंगपूर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संभाजी मोरे व विनायक गायकवाड अशी आरोपींची नावे असून, या प्रकरणी सरकारतर्फे विशाल सयाजी धनवडे यांनी फिर्याद दिली आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार (दि. २० डिसेंबर २०२५) रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास जयसिंगपूर शहरातील गल्ली क्रमांक सहा, आयसीआयसीआय बँकेच्या शेजारी असलेल्या नगरपालिकेच्या रस्त्यावर हा प्रकार उघडकीस आला.आरोपींनी पालिका प्रशासनाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता सार्वजनिक ठिकाणी डिजिटल फलक उभारला होता.सदर फलकावर राजकीय लोकप्रतिनिधींची नावे तसेच निवडणूक अनुषंगाने ‘एक अकेला सबसे भारी’ असा मजकूर प्रसारित करण्यात येत असल्याचे आढळून आले.निवडणूक काळात अशा प्रकारच्या जाहिराती, फलक व प्रचार साहित्यावर आचारसंहितेनुसार कडक निर्बंध असतात. मात्र, संबंधितांनी नियमांकडे दुर्लक्ष करून सार्वजनिक ठिकाणी प्रचारात्मक मजकूर प्रसारित केल्याने निवडणूक आचारसंहितेचा भंग झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या प्रकारामुळे सामाजिक सलोखा बिघडण्याची तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने सरकारतर्फे तक्रार दाखल करण्यात आली.त्यानुसार जयसिंगपूर पोलिसांनी आरोपींविरोधात संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे.पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल कांबळे करीत आहेत.दरम्यान, निवडणूक आचारसंहितेच्या कालावधीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कोणतीही तडजोड न करता कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा जयसिंगपूर पोलिसांनी दिला आहे. नागरिकांनी व राजकीय कार्यकर्त्यांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहनही पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!