कुंभोज – दानोळी रोडवरील स्मशानभूमीत अघोरी भानामतीचे प्रकार? नागरिकांमध्ये भीती, चर्चांना उधाण

Spread the love

कुंभोज / प्रतिनिधी 

कुंभोज – दानोळी रोडवरील हिंदू स्मशानभूमी परिसरात अघोरी भानामतीचे कथित प्रकार वाढल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.स्मशानभूमी परिसरात संशयास्पद हालचाली,विचित्र वस्तू आढळून येत असल्याच्या चर्चा रंगत असून या प्रकारांना तातडीने आळा घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे.अलिकडच्या काही दिवसांत कुंभोज व परिसरात अघोरी बाबांची संख्या वाढल्याची चर्चा असून,रात्रीच्या वेळी स्मशानभूमी परिसरात वावर वाढल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. विशेषतः महिला, वृद्ध व लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण असून रात्रीच्या वेळी त्या परिसरातून ये-जा करण्यास नागरिक टाळाटाळ करत आहेत.या कथित अघोरी प्रकारांमुळे कुंभोज परिसरात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे प्रकार घडवून आणले जात आहेत का, की केवळ अफवांचे पेव फुटले आहे, यावर दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. मात्र, नेमकी वस्तुस्थिती स्पष्ट व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.दरम्यान, अशा अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या प्रकारांवर आळा घालण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी पुढे येत आहे. तसेच हिंदू स्मशानभूमी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून कायमस्वरूपी नजर ठेवण्यात यावी, जेणेकरून अशा संशयास्पद प्रकारांना आळा बसेल, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.प्रशासन व ग्रामपंचायतीने याची दखल घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा नागरिकांचा रोष वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!