कोल्हापूर / प्रतिनिधी
विश्वासार्हतेच्या बळावर देशात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे ग्रामीण डाक पुरस्कारार्थी हे खऱ्या अर्थाने देशाचे नवरत्न असल्याचे गौरवोद्गार केंद्रीय दूरसंचार तसेच ईशान्य क्षेत्र विकास मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काढले.पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आयोजित ग्रामीण डाक सेवक (GDS) संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती,खासदार धनंजय महाडिक, डाक सेवा महासंचालक जितेंद्र गुप्ता, महाराष्ट्र सर्कलचे मुख्य पोस्टमास्तर जनरल अमिताभ सिंग, पोस्टल सर्व्हिसेस बोर्डाचे कार्मिक सदस्य सुवेंदुकुमार स्वैन, पुणे विभागाचे संचालक अभिजीत बनसोडे तसेच गोवा विभागाचे संचालक रमेश पाटील उपस्थित होते.मंत्री सिंधिया म्हणाले, सार्वजनिक क्षेत्रात आजही देशात सर्वाधिक विश्वासार्हता पोस्ट विभागाला मिळाली आहे. आधार कार्ड, बचत योजना, पासपोर्ट, गुंतवणूक अशा विविध सेवांमध्ये पोस्ट विभागाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ग्रामीण भागात काम करताना पोस्टमनना अनेक अडचणी येतात, मात्र ते कधीही आपल्या कर्तव्यात कसूर करत नाहीत. सध्या देशात पोस्ट विभागामध्ये ३७ कोटींहून अधिक खाती असून त्यामध्ये २१ कोटी रुपयांची बचत आहे. देशात १ लाख ६५ हजार ग्रामीण डाक वितरण केंद्रे कार्यरत असून ‘विकसित भारत – २०४७’ या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी पोस्ट विभागाने योगदान द्यावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.खासदार छ. शाहू महाराज म्हणाले की, जनतेशी खऱ्या अर्थाने नाळ जोडलेला विभाग म्हणजे डाक विभाग असून पोस्टमन हे समाजाच्या विश्वासाचे प्रतीक आहेत. खासदार धनंजय महाडिक यांनी देशात सुमारे ११ हजार नवीन पोस्ट कार्यालयांची निर्मिती झाल्याचे सांगितले.यावेळी सन २०२४-२५ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या दहा ग्रामीण डाक सेवकांचा मंत्री सिंधिया यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाला राज्यभरातून सहा हजारांहून अधिक डाक कर्मचारी उपस्थित होते.