स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शिये श्रीराम नगर परिसरातून अटक, शिरोली पोलीस ठाणे परिसर गुन्हेगारांचे आश्रय स्थान
पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
बिहार मधील कुख्यात गँगस्टर प्रेम यादव खून प्रकरणातील मुख्य दोघा आरोपींना रविवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शिये श्रीराम नगर परिसरातून अटक केली .शेजारी वसलेली शिरोली औद्योगिक वसाहत त्यामुळे येथे भाड्याने वास्तव्य करणारे परप्रांतीय कामगार दाटीवाटीची वस्ती याकडे शिये, नागाव, शिरोली पुलाची ग्रामपंचायतीसह पोलीस प्रशासनाचे असलेले दुर्लक्ष यामुळं श्रीरामनगर परिसर गुन्हेगारांचा आश्रयस्थान बनत आहे का? अशी विचारणा आता होऊ लागली आहे.बिहार मधील कुख्यात गँगस्टर प्रेम यादव याचा छापरा जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात दुचाकीवरून येऊन दोघांनी गोळीबार करून खून करण्यात आला होता. यातील संशयित आरोपी रोहित सिंग आणि कुणाल मांझी हे खून केल्यापासून पसार होते. दरम्यान बिहार पोलिसांना कुख्यात गँगस्टर प्रेम यादव खून प्रकरणातील आरोपी कोल्हापूर परिसरात असल्याची माहिती मिळाली होती.बिहार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिये पैकी श्रीरामनगर परिसरात सापळा रचून कुख्यात गँगस्टर प्रेम यादव खून प्रकरणातील मुख्य आरोपी रोहित सिंग आणि कुणाला मांझ या दोघाना अटक केली.या कारवाईमुळे शिरोली एमआयडीसी पोलीसांची झोप उडाली आहे.शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिरोली औद्योगिक वसाहतीचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आहे . या ठिकाणी अनेक परप्रांतीय कामगार काम करण्यासाठी येत असतात. शिये, शिरोली पुलाची ,नागाव या परिसरात भाड्याने वास्तव्य करतात. बिहार मधील दोन पसार आरोपींनी शिये पैकी श्रीराम नगर परिसरात वास्तव्य केल्याचा धक्कादायक प्रकार आज उघडकीस आल्याने हा परिसर परराज्यात गुन्हे करून वास्तव्य करणाऱ्या आरोपींचा अड्डाच बनलाय का?असा प्रश्न आता उपस्थित होत आहे . परप्रांतीय कामगारांच्या कोणतीही नोंद ना स्थानिक पोलीस स्टेशनला… ना ग्रामपंचायतला…. ना उद्योजकांना.. अशी परिस्थिती असून अनेक गुन्हेगार या परिसरात वास्तव्यात आहेत का काय? असे प्रश्न उपस्थित होत असून यापुढे तरी स्थानिक ग्रामपंचायत किंवा पोलीस स्टेशन कडून या परिसरात वास्तव्यास असणाऱ्या परप्रांतीय कामगारांची नोंद अथवा माहिती संकलित करण्यात येणार का?आणि परिसरात वास्तव्य करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई होणार का? आसा प्रश्न उपस्थित होतो आहे.