अन्यथा पेपर मिल सारख्या मोठ्या आंदोलनाचा मार्ग, दत्त कारखान्याच्या राखेच्या प्रदूषणामुळे शिरोळकर त्रस्त;

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

श्री दत्त साखर कारखान्याच्या चिमणीमधून उडणाऱ्या राखेमुळे शिरोळ शहरातील नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत.गेल्या काही दिवसांपासून वारंवार पडणाऱ्या राखेमुळे घरात, अंगणात,पाणीटाक्यांमध्ये,अगदी अन्नधान्यावरही काळसर धूळ साचत असल्याची तक्रार नागरिकांनी व्यक्त केली आहे.विशेषत: लहान मुले,ज्येष्ठ नागरिक आणि दमा-अॅलर्जी असलेल्या रुग्णांना या प्रदूषणाचा मोठा फटका बसत असल्याचे चित्र दिसत आहे.अनेक महिलांनी तर थेट कारखान्याच्या व्यवस्थापनाविरोधात संतापाची भावना व्यक्त केली.सकाळ-संध्याकाळ घर पुसूनही काळी धूळ साचते.मुलांना खोकला व डोळ्यांची जळजळ वाढली आहे.कारखान्याने याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे,असा सूर महिला बचत गटांच्या सदस्यांनी व्यक्त केला.नागरिकांचे म्हणणे आहे की,पर्यावरण नियमांचे काटेकोर पालन न झाल्याने हा त्रास वाढत चालला आहे.दरम्यान, नागरिकांचे लक्ष कारखान्याच्या जेष्ठ संचालक गणपतराव पाटील यांच्या भूमिकेकडे लागले आहे.मत मागायला आम्हाला भेटायला येतात,पण आमच्या आरोग्याच्या प्रश्नावर कोण बोलेल? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. गणपतराव पाटील यांच्याकडून या विषयावर स्पष्ट भूमिका किंवा उपाययोजना जाहीर होण्याची नागरिक प्रतिक्षा करत आहेत.स्थानिक सामाजिक संस्थांनीही पुढाकार घेत पर्यावरण विभागाकडे लेखी तक्रार दाखल करण्याची तयारी केली आहे.मध्यरात्रीची कारखाना परिसरातील फिल्टर सिस्टम सुधारली पाहिजे, चिमणीवरील नियंत्रण वाढवले पाहिजे.अन्यथा हा प्रश्न गंभीर आरोग्यसंकट निर्माण करू शकतो,असे पर्यावरण कार्यकर्त्यांचे मत आहे. शिरोळमध्ये दरवर्षी साखर हंगामात प्रदूषणाचा प्रश्न डोके वर काढतो.मात्र,यंदा राखेचे प्रमाण वाढल्याचे नागरिक सांगतात.प्रशासन व कारखाना व्यवस्थापन यांच्यात समन्वय नसल्याने जनतेच्या अडचणी अधिकच वाढल्या आहेत.नागरिक आता त्वरित व परिणामकारक उपाययोजना साठी अंकुश ठेवण्याची गरजेचे आहे अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत.अन्यथा पेपर मिल सारख्या मोठ्या आंदोलनाचा मार्ग अवलंबण्याची तयारीही काही नागरिकांनी दर्शवली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!