अब्दुल लाट / प्रतिनिधी
अब्दुल लाट येथील चैतन्य शिक्षण समूहाचे कार्यकारी संचालक व चैतन्य पब्लिक स्कूल अँड कॉलेजचे प्राचार्य शरद काळे यांना दक्षिण आफ्रिकेतील वेबिक युनिव्हर्सिटीकडून शिक्षण क्षेत्रातील गुणवत्तापूर्ण व प्रयोगशील कार्याबद्दल डॉक्टरेट पदवी जाहीर झाली असून या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.ही डॉक्टरेट पदवी ६ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता दिल्ली येथे आयोजित विशेष समारंभात प्रदान करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातून कार्य करत राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कार्याची छाप पाडणाऱ्या प्रा.शरद काळे यांचा हा सन्मान शिक्षण क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरत आहे.चैतन्य शिक्षण समूहाच्या माध्यमातून काळे यांनी शिक्षण क्षेत्रात अनेक नाविन्यपूर्ण प्रयोग राबवले.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देत,अध्यापनातील नवनवीन संकल्पना, उपक्रमाधारित शिक्षण,प्रयोगशील पद्धती यांचा सातत्याने अवलंब करून त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल घडवले.याच कार्याचा अभ्यासपूर्ण व संशोधनाधारित प्रबंध त्यांनी वेबिक युनिव्हर्सिटीत सादर केला होता.त्यांच्या प्रबंधाला आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावलेला दर्जा मिळाल्याने ही डॉक्टरेट जाहीर झाली आहे.या कार्यपूर्तीमध्ये त्यांना कोल्हापूर विभागीय जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. राजेंद्र भोई, माजी प्राचार्य डॉ. आय. सी. शेख, तसेच सांगली जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. विकास सलगर यांचे मार्गदर्शन लाभले.तसेच चैतन्य शिक्षण समूहाचे संस्थापक डॉ.दशरथ काळे यांनी दिलेली प्रेरणा आणि संस्थेचे सहकार्य हे त्यांच्या यशामागील महत्त्वाचे घटक ठरले आहेत.अब्दुल लाटसारख्या ग्रामीण भागात राहून आधुनिक,प्रयोगशील आणि विद्यार्थी-केंद्रित शिक्षणपद्धती राबविणारा एक यशस्वी प्राचार्य म्हणून शरद काळे यांनी केलेले कार्य आदर्शवत मानले जाते. आंतरराष्ट्रीय विद्यापीठाकडून मिळालेल्या या मान्यतेमुळे चैतन्य शिक्षण समूहाची शैक्षणिक परंपरा आणि गुणवत्ता अधिक उजळून निघाली आहे.त्यांच्या या यशाबद्दल शिक्षक,विद्यार्थी, पालक व स्थानिक नागरिकांनी अभिमान व्यक्त केला असून काळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.