शिरोळ / प्रतिनिधी
श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही दत्त जयंती उत्सवानिमित्त भाविकांची मोठी गर्दी उसळली.बुधवारी मध्यरात्रीपासून सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो दत्तभक्त पारंपरिक पायी नृसिंहवाडीच्या दिशेने रवाना झाले. दत्तत्रयाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी “श्री गुरुदेव गुरूदेव’’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.श्रद्धा,भक्ती आणि दत्त नामस्मरणाचा उत्साह यामुळे शिरोळ नृसिंहवाडी मार्ग भक्तिमय वातावरणाने फुलला होता.पायी जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी विविध सामाजिक संस्था पुढे सरसावल्या आहेत. त्यापैकी युसुफ पेट्रोलियमतर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भाविकांना मोफत पाण्याचे वाटप करण्यात आले.चालत जाताना थकलेल्या भाविकांना शुद्ध पाणी उपलब्ध करून देत त्यांच्या प्रवासात काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला.भाविकांच्या गर्दीतही सेवाभाव जपत हा उपक्रम अत्यंत शिस्तबद्धरीत्या राबवण्यात आला.या सामाजिक उपक्रमामागील प्रमुख प्रेरणास्थान युवा नेते हैदरअली मिस्त्री यांचे विशेष योगदान उल्लेखनीय आहे.गेले अनेक वर्षे विविध सामाजिक उपक्रमांतून समाजाशी असलेली बांधिलकी जपत ते सातत्याने जनसेवा करण्याचा प्रयत्न करत आहेत.भाविकांनीही या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले असून पायी वाटचालीत मिळणारे असे सहकार्य अतिशय मोलाचे आहे अशी भावना अनेक भाविकांनी व्यक्त केली.दत्त जयंतीनिमित्त नृसिंहवाडीत भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता स्थानिक प्रशासन,स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक तरुण मंडळे यात्रेच्या सुरळीततेसाठी परिश्रम घेत आहेत.सर्वत्र श्रद्धा,उत्साह आणि भक्तीचे वातावरण असल्याने यावर्षीचा दत्त जयंती उत्सव नेहमीप्रमाणे भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात पार पडत आहे.