दत्त जयंतीनिमित्त नृसिंहवाडी भाविकांनी दुमदुमली; मार्गशीष गुरुवार आणि दत्त जयंती दुग्धशर्करा योग

Spread the love

नृसिंहवाडी / प्रतिनिधी

श्री दत्त संप्रदायाची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे आज दत्त जयंती आणि मार्गशीर्ष गुरुवाराचा दुहेरी दुग्धशर्करा योग साधत उत्सवास भाविकांची मोठी गर्दी झाली असून मध्यरात्रीपासून शिरोळ-कुरुंदवाड मार्गावरून हजारो भाविक ‘श्री गुरुदेव दत्त’ नामाचा जप करीत थंडीची पर्वा न करता नृसिंहवाडी येथे पायी चालत दाखल होत आहे.पहाटे चार वाजताच मंदिर परिसर वातावरण दत्तमय झाला.महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा आणि गुजरात राज्यातून लाखो भाविक दर्शनासाठी येण्याचा अंदाज असल्याने येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये आणि सुरक्षिततेसाठी प्रशासनाने चोख नियोजन केले आहे.मंदिर परिसर,कृष्णा-पंचगंगा संगम घाट आणि संपूर्ण गावात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.दत्त जयंती निमित्त मंदिरात गेल्या सात दिवसांपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन सुरू आहेत.या उत्सवाचा मुख्य मान यंदा विनोद पुजारी (राजोपाध्ये) कुटुंबाकडे असून, त्यांच्या सहकार्याने सर्व कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.उत्सवानिमित्त पहाटे काकड आरती,षोडशोपचार पूजा,पंचामृत अभिषेक, महापूजा यांसारखे धार्मिक विधी संपन्न झाले. दुपारी पवमान पठण आणि पंचपदी कीर्तन झाल्यानंतर दुपारी चार वाजता श्रींची उत्सव मूर्ती गाभाऱ्यात आणण्यात येणार आहे. सायंकाळी पाच वाजता हजारो भाविकांच्या ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ जयघोषात श्रींचा जन्मकाळ सोहळा संपन्न होणार आहे.रात्री उशिरा धूप,दीप, आरती आणि पालखी सोहळ्याने दिवसाचे धार्मिक कार्यक्रम समाप्त होणार आहे.मंदिर परिसरात आकर्षक फुलसजावट, देखावे आणि प्रकाशयोजनांनी उत्सवाची भक्तिमय झाला आहे.महाराष्ट्र, कर्नाटक,गोवा आदी राज्यांतून दिवसभरात लाखो भाविकांनी दर्शन घेतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. येणाऱ्या भाविकांची गर्दीचे नियोजन करण्यासाठी शिरोळ पोलिसांनी एकेरी वाहतूक लागू करून व्यापक बंदोबस्त तैनात केला होता.ग्रामपंचायतीच्या वतीने पिण्याचे पाणी,विश्रांती व्यवस्था,पॅकिंगची सोय आदी सुविधा करण्यात आल्या. कुरुंदवाड एस.टी.आगाराने भाविकांच्या सोयीसाठी अतिरिक्त बसगाड्या सोडण्यात आल्या आहेत. मंदिर परिसरात व्हाईट आर्मी, अनिरुद्ध बापू सेवा मंडळ,दत्त मंदिर हायस्कूल व एनसीसी विद्यार्थी,पोलीस कर्मचारी तसेच ग्रामविकास अधिकारी हेमंत कोळी यांनी उत्सवाचे नेटके नियोजन केले आहे. दरम्यान मंदिरासमोरील कृष्णा नदीपात्रात अनुचित प्रकार टाळण्यासाठी नावाडी अरुण गावडे,भूषण गावडे,संकेत गावडे,व्हाईट आर्मी व वजीर रेस्क्यू फोर्सचे रौफ पटेल यांचे जवान सतत गस्त घालत आहेत.दत्त जयंती निमित्त नृसिंहवाडी नगरी भक्तिमय बनली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!