शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ नगरपरिषदेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ५ मधून उमेदवारी दाखल केलेले अमरसिंह शिंदे यांनी निकालाची वाट न पाहता थेट विकासकामांकडे मोर्चा वळवला आहे. २ डिसेंबर रोजी मतदान पार पडले असून निकाल २१ डिसेंबरला जाहीर होणार आहे.मात्र, निवडून आलो किंवा नाही,माझे समाजकार्य थांबणार नाही.जनतेच्या सेवेसाठी कायम उभा राहीन असे शिंदे यांनी स्पष्ट केले असून त्याचा प्रत्यय मतदानानंतरच्या दुसऱ्याच दिवशी आला.३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता प्रभाग ५ मधील विजयसिंहनगर आणि क्रांती चौक परिसरातील नागरिकांना दीर्घकाळ त्रासदायक ठरलेल्या भुयारी गटारीच्या कामासाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेतला.कामाला विलंब होत असल्याची माहिती मिळताच शिंदे थेट ठिकाणी पोहोचले.त्यांनी प्रशासनाशी चर्चा करून गटारकाम तात्काळ सुरू करून घेतले.प्रत्यक्ष पाहणीदरम्यान त्यांनी नागरिकांच्या तक्रारी मनापासून ऐकून घेतल्या तसेच संबंधित अधिकाऱ्यांना काम दर्जेदार व नियमांनुसार करण्याच्या सूचना दिल्या. शिंदे यांच्या या तत्परतेचे परिसरातील नागरिकांनी मोठे कौतुक केले आहे. निवडणुकीनंतर बरेच उमेदवार गायब होतात,पण आमच्या भागातील समस्या सोडवण्यासाठी शिंदे सर स्वतः पुढे आल्याने दिलासा मिळाला,अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.काही ज्येष्ठ नागरिकांनी तर अशा प्रकारे प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करणारे नेतृत्वच खऱ्या अर्थाने राजकारणात हवे असेही मत मांडले.आजकाल राजकारण फायद्यासाठीच केलं जात असल्याची टीका होत असताना,निकालाच्या प्रतीक्षेत न राहता जनतेच्या अडचणी दूर करण्यासाठी पुढाकार घेणारा उमेदवार म्हणून शिंदे यांनी एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.त्यांच्या कृतीमुळे प्रभागातील नागरी सुविधांच्या उन्नतीस गती मिळेल,अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. समाजकार्य ही माझी बांधिलकी आहे.कोणतेही पद असो वा नसो,लोकांच्या समस्या दूर करण्यासाठी मी सदैव तत्पर असे शिंदे म्हणाले. प्रभाग ५ मध्ये सुरू झालेल्या कामामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून भविष्यातील विकासाला नवी गती मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.