प्रभाग क्र.१० मधील या चारही उमेदवारांनी दिलेला एकतेचा संदेश आगामी पिढीसाठी आदर्श

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

शिरोळ नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज शांततेत मतदान पार पडले. गेल्या काही दिवसांपासून शिरोळमध्ये रंगलेली प्रचाराची झुंज,आरोप-प्रत्यारोपांचे फैर आणि पक्षीय राजकारणाने वातावरण तापले होते.प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला.मात्र,या सर्व राजकीय तापमानाला बाजूला सारत मतदान प्रक्रियेच्या शेवटी शिरोळमधील प्रभाग क्रमांक १० मध्ये आदर्शवत असा प्रसंग पाहायला मिळाला.या प्रभागात श्रीवर्धन माने देशमुख,ओंकार माने-गावडे,किरण माने-गावडे आणि कृष्णा देशमुख हे चारही उमेदवार परस्परांविरोधात निवडणूक लढवत होते.प्रत्येक जण वेगवेगळ्या पक्षातून रिंगणात उतरला होता आणि प्रचारादरम्यान तुफान स्पर्धा पहायला मिळाली.मात्र मतदान संपताच सर्व राजकीय भेदभाव बाजूला ठेऊन हे चारही उमेदवार एकत्र आले आणि एकमेकांना शुभेच्छा देत सौहार्दाचा आदर्श निर्माण केला.निवडणुकीतील कटुता बाजूला सारत, “आपण सर्वप्रथम शिरोळकर, नंतर राजकीय प्रतिस्पर्धी”असा संदेश देत या चौघांनी एकत्रित फोटो काढला आणि तो सोशल मीडियावर शेअर केला.काही क्षणातच हा फोटो व्हायरल झाला. राजकीय,सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रातील नागरिकांनी या कृतीचे मोठ्या प्रमाणावर स्वागत केले.मतदारांचा कौल आता मतपेटीत बंद झाला असला,तरी लोकशाहीची खरी सुंदरता ही एकजूट आणि सौहार्दातच असल्याचे त्यांनी दाखवून दिले.शिरोळमध्ये अनेक वर्षांनंतर असा सकारात्मक प्रसंग दिसून आला आहे. निवडणुकीत स्पर्धा असतेच;परंतु तिच्यापलीकडे मानवी नाती,सामाजिक भावना आणि परस्पर सन्मान हेही जपले गेले पाहिजे, याची जाणीव या उमेदवारांनी करून दिली. निवडणुकीच्या धावपळीमध्ये निर्माण झालेल्या तणावानंतर उमेदवारांची ही एकत्र येण्याची कृती शिरोळकरांसाठी नवी प्रेरणा ठरली आहे.मतदारांनीही याचे मनापासून कौतुक केले असून, हिच खरी राजकारणाची संस्कृती असली पाहिजे,अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.प्रभाग क्रमांक १० मधील या चारही उमेदवारांनी दिलेला एकतेचा संदेश आगामी पिढीसाठी आदर्श ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!