तेरवाड / प्रतिनिधी
तेलंगणा हैदराबाद येथे २८ ते ३० नोव्हेंबरदरम्यान झालेल्या राष्ट्रीय रोपस्किपिंग स्पर्धेत प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा तेरवाडचा विद्यार्थी श्रेयस महेश राणभरे (इ. ६ वी) याने उल्लेखनीय कामगिरी करून संपूर्ण संस्थेचा मान वाढवला आहे.डबल टच स्पीड या प्रकारात त्याने देशातील अव्वल खेळाडूंना मात देत तृतीय क्रमांक पटकावून ब्रॉन्झ मेडल आपल्या नावावर केले.राष्ट्रीय स्तरावरील या यशाच्या जोरावर श्रेयसची २१ ते २३ जानेवारी रोजी नेपाळमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय रोपस्किपिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यामुळे तेरवाड आश्रम शाळेतून आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड होणारा श्रेयस हा पहिला विद्यार्थी ठरला असून गाव,तालुका व जिल्ह्याचा नावलौकिक वाढवणारा हा ऐतिहासिक क्षण मानला जात आहे.श्रेयसने मिळवलेले ब्रॉन्झ पदक फक्त क्रीडा क्षेत्रातील यश नसून त्याच्या जिद्दीची,कठोर परिश्रमांची आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांची ही फलश्रुती आहे.परंतु या यशामागे संस्थेचे भक्कम मार्गदर्शन आणि प्रेरणादायी साथ महत्त्वाची ठरल्याचे शाळेतून सांगण्यात आले.श्रेयसला इतर मागास बहुजन कल्याण, कोल्हापूर येथील सहाय्यक संचालक सुनिता नेर्लेकर,तसेच गट ब अधिकारी अमित घवले यांचे सतत मार्गदर्शन लाभले. याशिवाय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब सावगावे, संस्थेच्या सचिव सौ.माधुरी सावगावे, मुख्याध्यापक बाबासाहेब तिबिले,क्रीडा शिक्षक शिवराज सुनगार,तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी श्रेयसला योग्य दिशा, प्रशिक्षण आणि प्रोत्साहन दिले.शाळेच्या व्यवस्थापनाने दिलेल्या संधींचा योग्य उपयोग करून श्रेयसने मिळवलेले हे यश तेरवाड आश्रम शाळेला सातासमुद्रापलीकडे पोहोचवणारे ठरले आहे.आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी श्रेयसची जोरदार तयारी सुरू असून त्याच्यावर सर्वांच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.