शिरोळ नगर परिषद निवडणूक : प्रभाग ३ मध्ये राजकीय समीकरण बदलले शिवानी कांबळेंना मतदारांचा वाढला पाठिंबा

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

शिरोळ नगर परिषदेच्या निवडणुकीचा रणसंग्राम अंतिम टप्प्यात पोहोचला असताना आज प्रचाराचा शेवटचा दिवस प्रभाग क्रमांक ३ मध्ये अत्यंत उत्साहात पार पडला.राजर्षी शाहू विकास आघाडीच्या उमेदवार सौ.शिवानी सुरज कांबळे यांना आज दिवसभर प्रभागातील मतदारांनी जाहीरपणे मोठा पाठिंबा दर्शवला.गेल्या आठ दिवसांपासून सुरु असलेल्या प्रचार मोहिमेला आज जणू शिगोशीग उसळी मिळाली असून कांबळे दाम्पत्यांच्या नेतृत्वावर मतदारांनी ठाम विश्वास व्यक्त केला आहे.प्रचाराच्या अखेरच्या दिवशी सामाजिक कार्यकर्ते सुरज कांबळे यांनी प्रभागातील गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामांचा तपशील मांडत मतदारांशी थेट संवाद साधला. आरोग्य शिबिर,स्वच्छता व्यवस्था,रस्ते दुरुस्ती,सार्वजनिक सुविधा,गरजू कुटुंबांना सतत मिळवून दिलेली मदत, महिलांच्या प्रश्नांवर घेतलेली पुढाकार यांसह अनेक सामाजिक उपक्रमांची माहिती मतदारांसमोर सविस्तरपणे मांडण्यात आली.प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सातत्याने कार्य केले असून पुढील काळातही अधिक जोमाने काम करण्याचा निर्धार असल्याचे त्यांनी सांगितले.दरम्यान, स्थानिक नागरिकांनीही आजच्या प्रचारात स्वयंस्फूर्तपणे मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.प्रभागातील विकासाला गती देणारा,सर्वसामान्यांच्या समस्या निवारणासाठी नेहमी उपलब्ध असणारा उमेदवार निवडणे हीच काळाची गरज असल्याचे नागरिकांनी स्पष्ट केले.विशेषतः महिलांना,ज्येष्ठ नागरिकांना आणि तरुण मतदारांना शिवानी कांबळे यांच्या उमेदवारीबद्दल विशेष आकर्षण जाणवत असल्याचे दृश्य आज सर्वत्र दिसून आले.घरदारी भेटी,प्रभागातील विविध भागांतील पदयात्रा, युवक-युवतींचा उत्स्फूर्त सहभाग,तसेच नागरिकांकडून उमेदवारांना मिळालेल्या आश्वासक प्रतिसादामुळे राजर्षी शाहू विकास आघाडीने प्रभाग क्रमांक ३ मध्ये मजबूत आघाडी घेतल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार असली तरी आजचा दिवस कांबळे यांच्या प्रचार मोहिमेच्या दृष्टीने निर्णायक ठरल्याचे मानले जात आहे. मतदारांनी “काम करणाऱ्यालाच संधी” देण्याचा घेतलेला निर्धार आणि उमेदवारांबद्दलचा सकारात्मक प्रतिसाद पाहता प्रभाग ३ मधील निवडणूक चुरशीची असली तरी निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!