शिरोळ / प्रतिनिधी
आगामी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरोळ शहर राजकीय गतीमानतेने ढवळून निघाले आहे.सर्व आघाड्यांचे प्रमुख उमेदवारांसह प्रचारात झोकून देत असून, आपल्या कार्यकाळातील विकासकामे आणि पुढील काळातील योजनांची माहिती घराघरात पोहोचवण्यावर भर देत आहेत.त्यात राजर्षी शाहू विकास आघाडीने विशेष जोमाने प्रचार मोहीम राबवली असून,विशेषतः महिला उमेदवारांना भक्कम साथ देत त्यांना मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा मोठा प्रयत्न सुरू आहे.राजर्षी शाहू विकास आघाडीच्या प्रचाराची धुरा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य सौ. इंद्रायणी अमरसिंह पाटील यांनी समर्थपणे सांभाळली.संपूर्ण शिरोळ शहरातील प्रभाग क्रमांक १ ते १० मधील मागील पाच वर्षांतील विकासकामांची परिपूर्ण यशोगाथा त्यांनी मतदारांसमोर प्रभावीपणे मांडली.क्षेत्रभेटी, पदयात्रा, लहान-मोठ्या सभांमधून तसेच घरगुती भेटीद्वारे त्यांनी केलेल्या कामांची उजळणी करून मतदारांचे लक्ष वेधून घेतले. पाणीपुरवठा सुधारणा,रस्त्यांचे डांबरीकरण,नळजोडणी वाढ, गटारींचे सांडपाणी व्यवस्थापन,महिलांसाठी विविध कल्याणकारी योजना,उद्यान दुरुस्ती, स्ट्रीट लाइटची उभारणी, स्वच्छता व कचरा व्यवस्थापन,व्यायाम शाळा,सांस्कृतिक हॉल, समाज मंदिर दुरुस्ती यासह अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांची माहिती त्यांनी तपशीलवार दिली.या सर्व कामांचा दाखला देत आघाडीने शिरोळ शहराच्या विकासात सातत्य,पारदर्शकता आणि लोकसहभाग या तिन्हींचा समन्वय साधला असल्याचा दावा केला.महिला उमेदवारांना प्रोत्साहन देत सौ.पाटील यांनी प्रत्येक कार्यक्रमात त्यांच्या कामाची व भविष्यातील दृष्टीची ओळख मतदारांसमोर करून दिली.”विकासकामे हीच आमची ओळख” या भूमिकेतून राजर्षी शाहू विकास आघाडीचा प्रचार सुरु असून,महिलांच्या नेतृत्वाला बळ देणे हा मुख्य उद्देश असल्याचे सांगत राजर्षी शाहू विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ.श्वेता काळे यांच्यासह सर्वच प्रभागातील उमेदवारांना प्रचंड मताने निवडून देण्याची आवाहन केले.शिरोळ शहरातील जनतेनेही प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, अनेक ठिकाणी नागरिकांनी उमेदवारांशी थेट संवाद साधत आपल्या अपेक्षा आणि अडचणी मांडल्या.आगामी काळात शहराच्या प्रगतीसाठी सक्षम,कार्यक्षम आणि लोकाभिमुख नेतृत्वाची गरज असल्याचे नागरिकांनी व्यक्त केले.निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत असून,विविध आघाड्यांमधील स्पर्धा चुरशीची होत आहे.मात्र,विकासकामांच्या आधारे मतदारांचा कौल मिळवण्याचा राजर्षी शाहू विकास आघाडीचा प्रयत्न नेमकेपणाने पुढे जात असल्याचे चित्र दिसत आहे.