‘लाडकी बहीण’ योजनेमुळे महिला आर्थिक सक्षम— मंत्री हसन मुश्रीफ

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

शिरोळ येथे आयोजित राजर्षी शाहू विकास आघाडीच्या प्रचार सभेत राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्य सरकारने राबविलेल्या‘लाडक्या लाडकी बहीण’ योजनेबाबत समाधान व्यक्त करत महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणावर भर दिला.या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यावर सतत व नियमितपणे मानधन जमा होत असल्याचा उल्लेख त्यांनी केला.पुढे बोलताना, आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून दिल्यास हे मानधन १५०० रुपयांवरून २१०० रुपये करण्याचा प्रयत्न करू असे आश्वासनही त्यांनी यावेळी व्यक्त केले.शहरातील प्रचार सभेत बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, नगरसेवक हा फक्त रस्ते–गटारी बांधण्यापुरता मर्यादित नसून शासनाच्या विविध योजना गरजूंपर्यंत पोहोचवण्याचे काम करणारा असावा.राजर्षी शाहू विकास आघाडीचे सर्व उमेदवार हेच कार्य प्रामाणिकपणे करतील,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.शिरोळ तालुक्यात गेल्या काही वर्षांत राज्य शासनाने विविध योजना प्रभावीपणे राबवल्या असून विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नगरविकास खाते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात असल्याने तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व त्यांचे बंधू संजय पाटील यड्रावकर यांच्या समन्वयातून शिरोळ तालुक्याला भरघोस निधी प्राप्त झाला आहे, असे त्यांनी सांगितले.सभेत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनीही शिरोळ नगरपालिकेच्या पहिल्या निवडणुकीपासून झालेल्या विकासाचा आढावा घेतला.अमरसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व उमेदवार निवडून आल्याने शहराला जवळपास २०० कोटी रुपयांचा निधी मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.नळपाणीपुरवठा,जुन्या तहसील कार्यालयाची इमारत नगरपालिकेला हस्तांतर,भुयारी गटार योजना, कलेश्वर तलावाचे सुशोभीकरण, तसेच सांस्कृतिक हॉलचे उभारकाम या महत्त्वपूर्ण प्रकल्पांची माहिती त्यांनी दिली.पुढील काळातही शहराला भरीव निधी देण्याचे आश्वासन त्यांनी व्यक्त केले.माजी आमदार उल्हास पाटील यांनी शिरोळ तालुक्यापुढील महापुराच्या संकटाचा उल्लेख करत राज्य शासनाने योग्य समन्वयातून हे संकट मोठ्या प्रमाणात टाळल्याचे सांगितले.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्याकडून शिरोळ शहराला मोठ्या प्रमाणात विकासनिधी प्राप्त झाल्याचे त्यांनी नमूद केले. हा विकास पुढेही सुरू ठेवण्यासाठी नागरिकांनी राजर्षी शाहू विकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला अमरसिंह पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत केले,तर आभार रणजीत पाटील यांनी मानले.सभेपूर्वी शहरातील प्रमुख मार्गावरून मंत्री हसन मुश्रीफ,आमदार यड्रावकर, माजी आमदार पाटील,आघाडीचे पदाधिकारी, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार श्वेता काळे आणि सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या उपस्थितीत भव्य रॅली काढून शक्तीप्रदर्शन करण्यात आले.या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, प्रकाश पाटील टाकवडेकर यांच्यासह राजर्षी शाहू विकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

error: Content is protected !!