“मोठी ब्रेकिंग न्यूज” नदीत पोहण्यासाठी गेलेल्या ६१ वर्षीय वृद्धावर मगरीने हल्लाने खळबळ

Spread the love

दत्तवाड / प्रतिनिधी 

दूधगंगा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या ६१ वर्षीय वृद्धावर मगरीने हल्ला करून केलेल्या जीवघेण्या प्रसंगाने दत्तवाड परिसरात खळबळ उडाली आहे.ही घटना आज सोमवार १ डिसेंबर रोजी सात वाजण्याच्या सुमारास घडली. लक्ष्मण कलाप्पा कलगी (वय ६१,रा.दत्तवाड) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार,लक्ष्मण कलगी हे रोजच्या सवयीप्रमाणे आपल्या काही सहकाऱ्यांसह दत्तवाड येथील दूधगंगा नदीत पोहण्यासाठी गेले होते. नेहमीप्रमाणे ते पुढे पोहत असताना अचानक पाण्यातून समोर आलेल्या मगरीने त्यांच्यावर झडप घातली. मगरीने त्यांना पाण्यात ओढून नेण्याचा प्रयत्न केला.धोकादायक परिस्थिती बघून त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ काठावरून आरडाओरडा केला.त्यांचा आवाज ऐकून मगर काही अंतरावर गेली आणि लक्ष्मण कलगी पाण्यातून वर तरंगताना दिसले.ही माहिती मिळताच नदीकिनारी नागरिकांची गर्दी जमू लागली.दरम्यान,दत्तवाड येथे सतत सक्रिय असलेल्या वजीर रेस्क्यू फोर्सच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन तत्काळ बचावकार्य सुरू केले.त्यांनी मोठ्या प्रयत्नांनंतर कलगी यांना बाहेर काढले.तथापि,तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.त्यांच्या मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली असून कलगी कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.घटनेनंतर संपूर्ण दत्तवाड तसेच दूधगंगा नदी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नदीकाठावरील नागरिकांनी प्रशासनाकडून नदीतील मगरींचा शोध घेऊन त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची मागणी केली आहे.संबंधित वनविभाग,पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी भेट देऊन पुढील उपाययोजना सुरू केल्या आहेत.दूधगंगा नदी परिसरात मागील काही महिन्यांपासून मगरींचे वाढते प्रमाण लक्षात घेता आता काळजी घेणे अत्यावश्यक असल्याचे स्थानिकांनी सांगितले.दत्तवाड येथे मात्र या दुर्दैवी घटनेमुळे शेतकरी वर्गात भीती व हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!