अमरसिंह पाटील यांनी नेत्यांनी सुचविलेल्या कार्यकर्त्यांना स्वीकृत नगरसेवक पदाची दिली संधी – अण्णासाहेब गावडे

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

शिरोळ नगरपरिषदेत प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून अमरसिंह पाटील यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर शिरोळच्या सर्वांगीण विकासाची नवीन सुरूवात झाली पाच वर्षांच्या कार्यकाळात कोणताही पक्ष,गट किंवा मतभेद न पाहता सर्वसमावेशक पद्धतीने काम करत नगरपरिषदेला कोट्यवधी रुपयांचा निधी मिळवून दिल्याने शहराचा कायापालट घडून आल्याचे प्रतिपादन राजर्षी शाहू आघाडीचे ज्येष्ठ नेते अण्णासाहेब गावडे यांनी केले. 

 

अमरसिंहपाटील यांनी नगराध्यक्षपद स्वीकारल्यापासून एकही क्षण वाया घालवला नाही.राजर्षी शाहू आघाडीबरोबर असणाऱ्या सर्व नेते – पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना त्यांनी विश्वासात घेतले.आघाडीतील सर्व नेत्यांनी सुचविलेल्या कार्यकर्त्यांना स्वीकृत नगरसेवक पदाची संधी देऊन त्यांचा सन्मान केला.त्यामुळे आघाडीच्या एकजुटीला बळ मिळाले.शहरातील विविध प्रभागांत विकासकामांना गती देताना कोणतीही राजकीय सीमारेषा ओलांडली नाही; उलट विरोधकांच्या प्रभागातही तितक्याच प्राधान्याने कामे झाली. पाच वर्षांच्या काळात शिरोळ नगरपरिषदेत झालेल्या विकासकामांची यादी मोठी आहे.रस्ते-गटारांचे सुधारणा काम, पाणीपुरवठा योजनेत केलेले बदल,स्वच्छता व्यवस्थेतील वाढलेली कार्यक्षमता,सार्वजनिक सुविधांमध्ये घेतलेली सुधारणा तसेच विविध कल्याणकारी योजनांसाठी मिळवलेला अपूर्व असा निधी ही त्यांपैकी काही उल्लेखनीय कामे आहेत.शहराचे सर्वांगीण स्वरूप बदलवण्यामध्ये या सर्व प्रकल्पांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

 

 

विशेष म्हणजे,नगराध्यक्ष पाटील यांच्या निर्णयांना विरोधकांनीही सभागृहात विरोध दर्शवला नाही,ही बाब गेल्या पाच वर्षांच्या प्रशासकीय कार्यप्रणालीची सर्वात मोठी जमेची बाजू असल्याचे गावडे म्हणाले.एखादा निर्णय हा सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचा असेल,त्यात पारदर्शकता असेल आणि त्यामागे निस्वार्थ हेतू असेल,तर त्याला विरोध करण्याची कुणाचीच इच्छा राहत नाही.पाटील यांनी घेतलेल्या निर्णयांकडे विरोधकांनीही सहमतीने पाहिले, हीच त्यांची काम करण्याची पद्धत आणि विश्वसनीयता दर्शवणारी बाब आहे,असे ते म्हणाले.शहरातील नागरिकांना कोणत्याही गटात विभागून न पाहता,सर्वसामान्य जनतेची कामांना प्राधान्य या तत्वावर पाटील यांनी कारभार केला.त्यामुळे विकासकामांमध्ये पारदर्शकता,गती आणि कार्यक्षमतेची पातळी वाढली.अनेक वर्षे रखडून पडलेली कामे पूर्णत्वास गेली.नवीन प्रकल्पांना मंजुरी मिळाली.निधी तातडीने उपलब्ध झाला.

 

 

राजर्षी शाहू आघाडीतील नेत्यांच्या एकजुटीबरोबर प्रशासनाचे नियोजनबद्ध काम आणि नागरिकांचा वाढता विश्वास या त्रिसूत्रीमुळे शिरोळ नगरपरिषद आज जिल्ह्यात आदर्श ठरत असल्याचे गावडे यांनी नमूद केले.यावेळी बोलताना त्यांनी असा विश्वास व्यक्त केला की,या पाच वर्षांत केलेल्या कामांचा आणि पाटील यांनी ठेवलेल्या निस्वार्थ कार्यपद्धतीचा फायदा नगरपरिषद निवडणुकीत निश्चित होईल. शिरोळची जनता आजही त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे आणि पुढेही उभी राहील.शहराच्या सर्वांगीण विकासाबाबत नागरिकांकडूनही सकारात्मक प्रतिक्रिया मिळत असून पुढील काळात शिरोळच्या प्रगतीचा वेग आणखी वाढेल,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!