शिरोळच्या विकासासाठी नागरिक नक्कीच विचारपूर्वक निर्णय घेतील, ताराराणी आघाडीची ताकद वाढली

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

शिरोळ शहरातील राजकारणावर पाटील – यादव गटाचे वर्चस्व गेली अनेक वर्षे कायम आहे.पाच वर्षे अमरसिंह पाटील यांच्या गटाकडे सत्ता राहिली तर पुढील पाच वर्षे अनिलराव यादव व पृथ्वीराज यादव यांच्या गटाने कारभार हाकला.या दोन्ही गटांच्या काळात शिरोळच्या विकासासाठी आमदार अशोकराव माने यांनी सातत्याने सहकार्याची भूमिका निभावली.मात्र यंदाच्या नगरपरिषद निवडणुकीत घडलेल्या नव्या बदलांनी शिरोळच्या राजकारणात मोठे समीकरण बदल घडवण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. यंदा नगराध्यक्ष पद अनुसूचित जाती महिला आरक्षणासाठी राखीव आहे.अशा स्थितीत आमदार अशोकराव माने यांच्या स्नुषा सौ.सारिका अरविंद माने या निवडणुकीत उतरल्याने शहरातील राजकीय वातावरण तापले आहे.अनेक वर्षे सहकार्य करणाऱ्या पाटील आणि यादव गटांनी आमदार माने यांच्या उमेदवारीला विरोध दर्शविला.यामुळे शिरोळच्या सर्वसामान्य जनतेच्या विश्वासावर नवा पर्याय देण्यासाठी आमदार माने यांनी ताराराणी आघाडी उभारून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.दरम्यान,शिरोळ शहरातील नागरिकांचे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहेत.सध्या एक दिवस आड मिळणारा पाणीपुरवठा,नियमित न होणारे कचरा व्यवस्थापन,शहरभर वाढलेला भटक्या कुत्र्यांचा त्रास, अकार्यक्षम सांडपाणी योजना,अतिक्रमण नियमितीकरण, तरुणांना उद्योग व्यवसाय तसेच घनकचऱ्याची अनियमित विल्हेवाट या समस्या वाढत चालल्या आहेत.शिरोळ हे तालुक्याचे ठिकाण असूनही शहरात सुरक्षा व्यवस्थेसाठी आवश्यक सीसीटीव्ही कॅमेरे,नियंत्रण कक्ष किंवा निगराणी व्यवस्था अद्याप उभी राहिलेली नाही.नगरपरिषद स्थापन झाल्यावर या सुविधा उपलब्ध होतील, असा विश्वास नागरिकांना होता; मात्र मागील काही वर्षांमध्ये याबाबत कोणतीही ठोस प्रगती न झाल्याने नागरिकांचा भ्रमनिरास झाला आहे.या पार्श्वभूमीवर आमदार अशोकराव माने यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी जोरदार प्रयत्न करण्याचे आश्वासन देत ताराराणी आघाडी मजबूत केली आहे.केंद्र व राज्यातील भाजपचे सरकार देखील शिरोळ शहराला विकासासाठी आवश्यक असलेला भक्कम निधी देण्यासाठी आमदार अशोकराव माने यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले आहे.त्यामुळे शिरोळ शहरासाठी मागील तेवढा निधी केंद्र व राज्यातून मिळेल असा आत्मविश्वास आमदार माने यांनी व्यक्त केला आहे.रस्ते, पाणीपुरवठा,स्वच्छता,सांडपाणी,सुरक्षा उपाययोजना, आधुनिक सुविधा अशा अनेक क्षेत्रांमध्ये मोठे प्रकल्प राबविण्याचा मानस त्यांनी स्पष्ट केला आहे.विशेषतः नागरिकांच्या मूलभूत सुविधा आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यास प्राधान्य दिले जाणार असल्याची माहिती आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.ताराराणी आघाडीच्या प्रवेशामुळे शिरोळची निवडणूक अधिक रंगतदार झाली आहे. पारंपरिक पाटील-यादव गटाच्या विरोधात नव्याने उभा राहिलेला पर्याय, तसेच नागरिकांच्या मनातील बदलाची इच्छा या सर्व घटकांमुळे शहरातील राजकीय वातावरण चुरशीचे झाले आहे.आगामी काही दिवसांत प्रचाराला गती मिळताच स्थानिक राजकारणात आणखी बदल होण्याची शक्यता आहे. शिरोळ शहराच्या विकासासाठी कोणता पर्याय स्वीकारायचा, हे ठरवताना नागरिक नक्कीच विचारपूर्वक निर्णय घेतील,अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. शिरोळच्या या ऐतिहासिक निवडणुकीकडे तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागून राहिले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!