शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ नगर परिषदेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू होताच आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले आहे.याच पार्श्वभूमीवर तालुक्याच्या राजकारणात प्रभावी मानल्या जाणाऱ्या यादव घराण्याचा वारसा आणि नैतिक मूल्यांची परंपरा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.माजी आमदार दीनबंधू दलितमित्र स्वर्गीय दिनकरराव यादव यांच्या लोकाभिमुख कार्यपद्धतीचा वारसा त्यांचे नातू पृथ्वीराज सिंह यादव हे आजही जपत असल्याचे शिरोळमध्ये मोठ्या प्रमाणावर बोलले जात आहे.दीनबंधू स्व.दिनकरराव यादव यांनी आमदारकीच्या काळात कोणत्याही जात-धर्माचा भेद न करता सर्वसामान्य,गोरगरिबांसोबत राहून त्यांना सन्मान,आपुलकी आणि न्याय देण्याचे काम केले.गरिबांच्या झोपड्यांमध्ये जाऊन त्यांच्यासोबत जेवण करत माणूस म्हणून आपण सर्वजण एक आहोत असा आत्मविश्वास त्यांच्या मनात रुजवणारा त्या काळातील त्यांचा सोज्वळ स्वभाव आजही लोक विसरू शकलेले नाहीत. सर्वसमावेशक विचारसरणी आणि लोकांप्रति असलेल्या आत्मीयतेमुळेच शिरोळ व परिसरातील जनतेने त्यांना ‘दीनबंधू दलितमित्र भाई’ उपाधी बहाल केली होती.आजच्या काळात राजकारणाला सत्तेची व व्यक्तिगत स्वार्थाची किनार लाभल्याची टीका होत असताना पृथ्वीराजसिंह यादव यांनी मात्र बदल घालून लोकाभिमुख कार्यास प्राधान्य दिले आहे. कोणतेही मोठे राजकीय पाठबळ,शिक्षण संस्था वा औद्योगिक साम्राज्य नसतानाही जनतेच्या विश्वासाच्या बळावर त्यांनी स्वतःचे नेतृत्व उभे केले आहे. शिरोळकरांनी दिलेल्या या पाठिंब्यामुळे पृथ्वीराज यादव यांच्या नेतृत्वाची ताकद आणखी दृढ झाल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.दरम्यान, नगराध्यक्ष पदासाठी यंदा अनुसूचित जाती महिला आरक्षण जाहीर झाल्यानंतर शिरोळमध्ये राजकीय समीकरणे हलू लागली.याच निर्णायक क्षणी पृथ्वीराज यादव यांनी राजकीय संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकी दाखवत सौ.योगिता कांबळे यांना शिव शाहू यादव आघाडीतर्फे उमेदवारी देत त्यांना राजकीय सन्मान दिला.शिरोळ नगरपरिषद अस्तित्वात यावी यासाठी भूतकाळात दिलेल्या त्यांच्या योगदानाची दखल घेत सौ.कांबळे यांची निवड केल्याने यादव यांच्या निर्णयक्षमतेचे कौतुक होत आहे.एका सर्वसामान्य कुटुंबातील महिलेला उमेदवारी दिल्यामुळे बौद्ध समाजासह वंचित घटकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. “धनशक्ती विरुद्ध जनशक्ती”असे घोषवाक्य देत पृथ्वीराज यादव यांनी सामान्य नागरिकांच्या बळावर निवडणूक लढवण्याचा संदेश दिला आहे.मोठ्या आर्थिक शक्तींच्या राजकारणाला छेद देत सामाजिक समरसता,विश्वास आणि पारदर्शकतेला प्राधान्य देण्याचा प्रयत्न त्यांनी केला असल्याचे दिसून येते.या संपूर्ण घडामोडीमुळे दीनबंधू दलितमित्र भाई स्व.दिनकरराव यादव यांची आठवण पुन्हा एकदा ताजी झाली आहे.त्यांच्या कार्याची छाप आणि लोकांप्रति जिव्हाळ्याची भावना आजही शिरोळच्या जनमानसात जिवंत आहे.पृथ्वीराजसिंह यादव यांचे नेतृत्व त्या परंपरेचे प्रतिबिंब ठरत असून शिरोळ नगरपालिका निवडणूक यंदा रंगतदार होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.