शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ शहरात तब्बल १७९.५२ कोटींच्या विकासकामांची गेल्या पाच वर्षांत अंमलबजावणी झाल्याचे माहितीपत्रकांद्वारे जोरदार प्रसिद्धी करण्यात येत आहे.मात्र या गाजावाजा आणि विकासाच्या दाव्यांच्या पार्श्वभूमीवर शहरातील गाव स्थळ पांढरी म्हणून ओळखले जाणारे प्रभाग क्रमांक ८ मधील थळोबा देवालय मात्र अत्यंत दुरावस्थेत असल्याचे वास्तव नागरिकांच्या डोळ्यांसमोर आले आहे.शाहूनगर परिसरातील हे प्राचीन देवस्थान अनेक वर्षांपासून देखभाल आणि दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे आज अत्यंत जीर्ण स्थितीत उभे आहे.देवालयाच्या भिंतींना मोठ्या प्रमाणात झाडे व वेलींनी वेढा घातला असून त्यामुळे त्या भिंती धोकादायक बनल्या आहेत.छतावरील अनेक कौले फुटलेली आहेत.पावसाळ्यात देवालयाच्या आतील भागात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचते.देवत्वाचा व भक्तिभावाचा केंद्रबिंदू असलेले हे मंदिर आज दुरावस्थेत असल्याचे चित्र पाहून नागरिक संतप्त झाले आहेत.शहरातील कोणतेही शुभकार्य,सोहळा किंवा नवीन उपक्रम असला,तरी प्रथम थळोबा देवालयात नारळ फोडून, नैवेद्य अर्पण करूनच शुभारंभ करण्याची परंपरा आजही कायम आहे.पण देवस्थानाकडे खासदार,आमदार,नगराध्यक्ष आणि स्थानिक नगरसेवक यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.विकासकामांच्या लाखो-कोटीच्या योजनांचा दावा करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी या प्राचीन देवालयाची अवस्था पाहिलेलीच नाही,अशी नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे.गेल्या अनेक वर्षांपासून आमच्या देवालयाची अवस्था अशीच आहे.भिंतीला झाडे उगवली,पावसात मंदिर पाण्याने भरते…पण कोणाचं लक्ष जात नाही.विकासाच्या मोठमोठ्या जाहिराती बघायला वेळ आहे,पण देवालय दुरुस्तीसाठी वेळ आणि निधी नाही,अशा भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केल्या.शिरोळमध्ये विकासाच्या गप्पांचा गाजावाजा केला जात असला,तरी सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा जपण्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप होत आहे.नागरिकांनी लोकप्रतिनिधींना आवाहन केले आहे की,एकदा तरी प्रचाराच्या काळात जसे तुम्ही मंदिरात दर्शनाला जाता,तसे आता प्रत्यक्ष येऊन या देवालयाची स्थिती पाहावी आणि तातडीने दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत.थळोबा देवालयाची दुरुस्ती आणि संरक्षण अत्यंत आवश्यक असून,शहरातील नागरिकांच्या भावनांचा आदर करून प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात,अशी एकमुखाने मागणी होत आहे.