शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यातील राजकारणात ‘काका–पुतण्या’ हे समीकरण कायमच चर्चेचा विषय राहिले आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर असताना या समीकरणात यंदा महत्त्वाचा कलाटणीचा क्षण पाहायला मिळाला आहे.प्रभाग क्रमांक ९ मधून पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रताप उर्फ बाबा पाटील यांनी आपली उमेदवारी मागे घेत पुतण्या पद्मसिंह पाटील यांना उमेदवारी देत मोठा राजकीय संदेश दिला आहे.स्थानिक राजकारणात दोघांचाही प्रभाव लक्षणीय असताना बाबा पाटील यांनी पक्षनिष्ठा, संघटनशीलता आणि कुटुंबातील ऐक्य या त्रिसूत्रीला प्राधान्य देत घेतलेला हा निर्णय सर्वत्र कौतुकास पात्र ठरत आहे.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय पाटील कुटुंबातील समन्वय बळकट करणारा ठरला असून, प्रभाग क्रमांक ९ मधील निवडणुकीत नव्या राजकीय शक्यता निर्माण झाल्या आहेत.पद्मसिंह पाटील यांच्या उमेदवारीनंतर स्थानिकांना तरुण, ऊर्जावान आणि नवा पर्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.बाबा पाटील यांनी कुटुंबातील सुसंवादाला प्राधान्य देत राजकीय समीकरणाला दिलेला हा वेगळा आकार विरोधकांच्या अपेक्षेच्या बाहेरचा ठरला आहे.त्यामुळेच पाटील यांच्या निर्णयाने विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.यामुळे काही विरोधकांकडून त्यांच्या विरोधात मतप्रवाह बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू केल्याची चर्चा देखील कानावर येत आहे.मात्र, हे सर्व प्रयत्न राजकीय असंतोषातून होत असल्याचे बाबा पाटील यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे.या संपूर्ण घडामोडीनंतर प्रभाग क्रमांक ९ मधील निवडणूक अधिक चुरशीची होणार हे स्पष्ट झाले आहे.पाटील कुटुंबाच्या एकत्रित निर्णयामुळे पद्मसिंह पाटील यांची उमेदवारी बळकट झाल्याचे सर्वत्र मानले जात असून,त्यांच्या प्रचाराला स्थानिक कार्यकर्त्यांकडून मोठा पाठिंबा मिळत आहे.आगामी दिवसांत प्रचाराला वेग आल्यावर या प्रभागातील निवडणूक कोणत्या दिशेने वळते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.शिरोळच्या राजकारणात नव्या समीकरणांची बीजे रोवली गेल्याचे स्पष्ट संकेत या निर्णयातून मिळत आहेत.