शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक चारमध्ये मोठी विकासकामे झाल्याची चर्चा जोरात सुरू असताना, या प्रभागातील मूलभूत सुविधांकडे मात्र सातत्याने दुर्लक्ष झाल्याचा आरोप उमेदवार सौ.शारदा सुनील माने यांनी केला आहे. प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, महिला व सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या समस्या प्रत्यक्ष पाहिल्यामुळेच लोकप्रतिनिधी म्हणून निवडणुकीत उतरल्याचे त्या म्हणाल्या.सध्या प्रभागात घनकचरा व्यवस्थापनाची दुरवस्था,अपुऱ्या गटारींची समस्या,असमतोल व खराब रस्ते,तसेच शुद्ध व मुबलक पाण्याची टंचाई अशा अनेक नागरी अडचणी गंभीर स्वरूपात आहेत. नगरपालिकेच्या दाव्यांनुसार विकास कामांची यादी मोठी असली तरी नागरिकांचा दैनंदिन त्रास वाढतच असल्याचे त्या म्हणाल्या.विशेषतः प्रभागाच्या हद्दवाढीचा महत्त्वाचा व जिव्हाळ्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, प्रशासनाकडून त्याकडे योग्य लक्ष दिले जात नसल्याचा त्यांनी आरोप केला.प्रभागातील महिलांना पाणीटंचाईमुळे त्रास सहन करावा लागतो,ज्येष्ठ नागरिकांना खराब रस्तेमुळे हालअपेष्टा भोगाव्या लागतात.घनकचरा वेळेवर उचलला जात नसल्याने अस्वच्छता वाढते. हे सर्व प्रश्न मी जवळून अनुभवल्यामुळेच प्रभागाचे नेतृत्व करून या समस्या सोडवण्याचा निर्धार केला आहे,असे सौ.माने यांनी स्पष्ट केले.प्रभागातील विकास केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्षात प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचला पाहिजे,यासाठी प्रभागातील मतदारांनी खंबीर साथ द्यावी,असे आवाहन त्यांनी केले.आगामी निवडणुकीत मिळणाऱ्या जनसमर्थनाच्या जोरावर प्रलंबित प्रश्न मार्गी लावून प्रभाग क्रमांक चारचा सर्वांगीण विकास करण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.