शिरोळ/ प्रतिनिधी
२०१८ साली ग्रामपंचायतीतून नगरपरिषद झालेल्या शिरोळ शहरात पहिल्याच पंचवार्षिक निवडणुकीत राजर्षी शाहू विकास आघाडीला मोठे यश मिळाले.माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषदेची धुरा जनतेने या आघाडीच्या हातात दिली.त्यांच्या माध्यमातून शहरात कोट्यवधी रुपयांचा निधी मिळाल्याचे मानले जाते.मात्र गेल्या सहा महिन्यांपासून शिरोळ नगरपरिषद विविध कारणांनी चर्चेत आहे. नगरपरिषदेमध्ये झालेल्या कथित लाचलुचपत विभागाच्या कारवाई, भ्रष्टाचाराच्या आरोपांपासून ते अपुऱ्या पाणीपुरवठ्यापर्यंत अनेक प्रश्नांवर विरोधक सातत्याने आवाज उठवत आहेत.कचरा संकलनाच्या ठेक्यासह काही नगरसेवकांच्या ठेक्यांमध्ये सहभाग असल्याच्या तक्रारीही विरोधकांकडून केल्या जात आहेत.या सर्व प्रकरणांवर राजर्षी शाहू विकास आघाडीचे नेते आणि आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी कोणतीही स्पष्ट प्रतिक्रिया दिली नसल्याने शहरात विविध चर्चांना ऊत आला आहे.भ्रष्टाचाराच्या आरोपांवर मौन ठेवून सत्ता टिकवली जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला असून,नागरिकांमध्येही या संदर्भात संभ्रमाचे वातावरण दिसत आहे. पाणीपुरवठ्याच्या गंभीर समस्येमुळे छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या उपोषणावेळीही आमदार यड्रावकर अनुपस्थित राहिल्याची चर्चा शहरात रंगली होती.याच पार्श्वभूमीवर आगामी नगरपरिषद निवडणुकांच्या तोंडावर आमदार यड्रावकर आघाडीची सत्ता पुन्हा स्थापण्यासाठी मोर्चेबांधणी करत आहेत.प्रचारसभांमध्ये ते विविध आश्वासने देत असले तरी नगरपरिषदेतील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवर त्यांनी अद्याप एकही थेट भूमिका मांडलेली नाही.यामुळेच नागरिकांमध्ये एकच प्रश्न उपस्थित होत आहे.छत्रपती शिवाजी महाराज चौकातील जाहीर सभेत आमदार यड्रावकर नगरपरिषदेतील आरोपांवर खुलासा करतील का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.शिरोळ पंचवार्षिक निवडणुकीचा रंग दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.