शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ नगर परिषदेच्या निवडणुकीची धामधूम वाढत असतानाच राजकीय वातावरणात भानामतीचे प्रकार समोर येऊ लागले आहेत. प्रभाग क्रमांक २ मधील राजर्षी शाहू विकास आघाडीच्या उमेदवार सौ.शकुंतला वसंत पाटील मलिकवाडे यांच्या घरासमोर अज्ञात व्यक्तींनी भानामती करण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे.या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार,शिरोळ–अर्जुनवाड रोडवरील मलिकवाडे यांच्या निवासस्थानी आज पहाटेच्या सुमारास नारळ,बुक्का, कणकीचा गोळा,गुलाल तसेच इतर काही साहित्य ठेवलेले आढळले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून गेली दोन दिवस घराजवळील बाकड्यावर एक व्यक्ती येते त्यावेळी परिसरातील ५ मिनिटांसाठी विद्युत पुरवठा बंद होतो पुन्हा ती व्यक्ती गेल्यानंतर विद्युत पुरवठा सुरू होतो असा प्रकार भीतीदायक वातावरण निर्माण करण्याचा किंवा उमेदवारांना मानसिकदृष्ट्या खच्ची करण्याचा प्रयत्न म्हणून या प्रकाराकडे पाहिले जात आहे.सकाळी आसपासच्या नागरिकांनी या साहित्याची नोंद घेताच हा प्रकार त्वरित सर्वत्र चर्चेचा विषय ठरला.या संदर्भात रावसाहेब पाटील मलिकवाडे आणि वसंत पाटील मलिकवाडे यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले अशा भानामतीच्या आणि अंधश्रद्धा पसरविणाऱ्या कृतींना घाबरण्याची गरज नाही. विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरल्याने अशा बालिश प्रकार सुरू असून लोकशाहीच्या प्रक्रियेला बाधा आणण्याचा हा प्रयत्न असून जनता अशा गलिच्छ राजकारणाला योग्य उत्तर मतपेटीतून देईल,असे सांगितले.त्यांनी कार्यकर्ते आणि समर्थकांना शांतता व संयम पाळण्याचे आवाहन केले आहे.प्रभाग क्रमांक २ मध्ये निवडणूक चुरशीची झाली असून सर्वच पक्ष जोरदार प्रचारात गुंतलेले आहेत.त्यातच असा भानामतीचा प्रकार समोर आल्याने निवडणूक प्रक्रियेच्या सुरक्षेवर आणि स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.या घटनेची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.जनतेमध्ये शिक्षण, विकास व प्रामाणिक नेतृत्वाबाबत चर्चा सुरु असताना अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या घटना होणे ही दुर्दैवी बाब असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.आगामी निवडणुकीत अशा कृत्यांना मतदार कडाडून विरोध दर्शवतील,असा विश्वासही व्यक्त केला जात आहे.