ब्लिचिंग पावडरचा ठेका मुद्दा विरोधक गाजवणार ?, आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना मतदार धडा शिकवतील ?

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरोळ शहरात सध्या नगरपालिकेतील ठेकेदारीबाबत सुरू असलेल्या चर्चेला उधाण आले आहे. निवडणुकीत निवडून आल्यानंतर जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून,मित्राच्या नावावर पालिकेतील ठेके घेऊन शासनाच्या पैसा गोळा केल्याची कुजबुज नागरिकांमध्ये सुरू आहे.विशेषत: गेल्या चार वर्षांत या ठेकेदारीमधून भरमसाठ आर्थिक लाभ घेतल्याची चर्चा शहरभर पसरत असून,यंदाच्या निवडणुकीत मतदार अशा गोरखधंद्याला चाप देणार असल्याचे नागरिकांकडून म्हटले जात आहे.शहराला शुद्ध आणि मुबलक पाणी मिळावे यासाठी नगरपालिका विविध सेवा आणि साहित्य खरेदीचे ठेके देते.त्यामध्ये पाणी शुद्धीकरणासाठी लागणाऱ्या ब्लिचिंग पावडरचा ठेकाही महत्त्वाचा मानला जातो.मात्र, नागरिकांच्या मते गेल्या अनेक वर्षांपासून शहराला स्वच्छ पाणी मिळालेच नाही.ब्लिचिंग पावडर प्रत्यक्षात पाण्यात मिसळली गेली की नाही,याकडे पालिका प्रशासनानेही पुरेसे लक्ष दिले नसल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे.तरीही या ठेक्यांचे बिल मात्र मोठ्या रकमेने काढले गेले असून,यातून संबंधित नगरसेवकाने मोठा आर्थिक फायदा घेतल्याची चर्चा रंगली आहे.नागरिकांचे म्हणणे आहे की जमवलेल्या पैशाच्या जोरावर पुन्हा निवडणूक लढवत असून यावेळी प्रभागातील मतदार आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना योग्य धडा शिकवतील.शहरात सुरू असलेल्या चर्चेची नगरपालिकेकडून अधिकृत पुष्टी केलेली नसली तरी, नागरिकांमध्ये असलेल्या नाराजीचे वातावरण स्पष्ट जाणवत आहे.मूलभूत सुविधा,विशेषतः शुद्ध पाणीपुरवठा,हा निवडणुकीतील मुख्य मुद्दा ठरणार असून,येणाऱ्या निवडणुकीत मतदार भ्रष्टाचार आणि ठेकेदारीतील मनमानीला थारा देणार नाहीत,अशीही भावना शहरात व्यक्त होत आहे.शिरोळच्या राजकीय वातावरणाला या चर्चा आणखी तापणार असून, पुढील काही दिवसांत या प्रकरणी आणखी घडामोडी घडण्याची शक्यता नागरिक वर्तवित आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!