जयसिंगपूर / प्रतिनिधी
जैनापुर (ता. शिरोळ) येथील श्रीकृष्ण प्रभाकर पटवर्धन यांच्या शेतातील घरात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या खत कारखान्यावर कृषी विभागाने बुधवारी सायंकाळी छापा टाकून कारवाई केली.येथून सुमारे १५ प्रकारच्या खताचा असा एकूण २८ लाख ४० हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला आहे.या बनावट खताच्या कारखान्यामुळे शिरोळ तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अनय प्रशांत घुणागे (वय २१ राहणार मुन्नालाल पॅराइडीज आकाशवाणी समोर हडपसर, पुणे) याच्या विरोधात जयसिंगपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून जयसिंगपूर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.याबाबतची फिर्याद अनुप सूर्यकांत रासकर यांनी जयसिंगपूर पोलिसात दिली आहे.याबाबत अधिक माहिती अशी, कृषी विभागाच्या पथक्याला जैनापूर येथे बेकायदेशीपणे खत तयार करणाऱ्या ठिकाणाची माहिती मिळाली होती. त्यानुसार बुधवारी सायंकाळी या पथकाने छापा टाकला. या छाप्यात विनापरवाना खत उत्पादन करणे, उत्पादनाच्या ठिकाणी प्रयोगशाळा नसणे, अस्तित्वात असणाऱ्या कंपनीच्या नावे उत्पादन करणे, योग्य लेबल नसणे अशा विविध गोष्टी नसतानाही बेकायदेशीरपणे खत तयार करण्यात येत होते. यात सुमारे १५ प्रकारच्या खताचा मोठ्या साठा आढळून आला. यात एकूण २८ लाख ४० हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला आहे.अधिक तपास जयसिंगपूर पोलीस करीत आहेत.