प्रभाग १० मध्ये पैशाच्या राजकारणाला आव्हान देणारा तरुण कृष्णा देशमुख अपक्ष उमेदवार म्हणून चर्चेत

Spread the love
शिरोळ / प्रतिनिधी 
शिरोळ नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १० मध्ये आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पैशाच्या जोरावर होणारा प्रचार, गटबाजी आणि भव्य पोस्टरबाजी यांची चर्चा कायम असतानाच एका तरुण अपक्ष उमेदवाराने मतदारांचे लक्ष वेधून घेतले आहे.शेतकरी कुटुंबातून आलेला कृष्णा देशमुख हा या निवडणुकीत निस्वार्थी आणि प्रामाणिक पर्याय म्हणून पुढे येत असल्याची मतदारांत चर्चा आहे.कृष्णा देशमुख कोणत्याही राजकीय घराण्यातून आलेला नसून त्याचा प्रवास संघर्षातून आकाराला आला आहे.शेती हा व्यवसाय आणि समाजकारण ही मूल्ये घेऊन तो गेल्या काही वर्षांत विविध स्थानिक प्रश्नांवर काम करताना दिसला आहे.उसदराच्या आंदोलनात सक्रिय सहभाग,नगरपालिकेतील बेकायदेशीर कामकाजाविरोधात आवाज उठवणे,तसेच पाणी,रस्ते,गटार व कचरा व्यवस्थापनातील त्रुटींबाबत प्रशासनासमोर ठामपणे भूमिका मांडणे या कामांमुळे तो ‘लोकांचा माणूस’ म्हणून ओळखला जाऊ लागला.अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा त्याचा निर्णयही चर्चेचा विषय ठरत आहे. कोणत्याही पक्षाचा पाठिंबा न घेता केवळ लोकांचा विश्वास आणि स्वतःची काम करण्याची जिद्द यांच्या जोरावर तो मैदानात उतरला आहे.राजकारण हे माझ्यासाठी व्यवसाय नसून कर्तव्य आहे,असे देशमुख सांगतात.एका बाजूला मोठ्या प्रमाणात खर्च,जाहिरात आणि चमकधमक करणारे उमेदवार असताना दुसऱ्या बाजूला साध्या जीवनातून आलेला तरुण म्हणून कृष्णा देशमुख मतदारांना वेगळा पर्याय देत असल्याचे स्थानिक नागरिक सांगतात. प्रभागातील दैनंदिन समस्या ऐकून तातडीने उपाय शोधण्याची त्याची पद्धत आणि भ्रष्टाचाराविरोधातील भूमिका यामुळे अनेक तरुण मतदार त्याला समर्थन देत असल्याचे बोलले जात आहे.प्रभागासमोर आज पैशाच्या राजकारणाला प्रामाणिक पर्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली जात असून,देशमुख सभागृहात पोहोचल्यास गावाच्या विकासकामांना वेग मिळेल,अशी अपेक्षा काही नागरिकांनी व्यक्त केली आहे. आगामी निवडणुकीत मतदार कोणाला पसंती देतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!